Republic Day Parade 2026 tickets
नवी दिल्ली : भारताच्या लष्करी सामर्थ्याचे आणि सांस्कृतिक विविधतेचे दर्शन घडवणाऱ्या 'प्रजासत्ताक दिन संचलन २०२६' ची तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे. संरक्षण मंत्रालयाने या भव्य सोहळ्यासाठी तिकीट विक्रीची घोषणा केली असून, आजपासून (दि. ५) सामान्य जनतेला ही तिकिटे खरेदी करता येत आहेत. विशेष म्हणजे, अवघ्या २० रुपयांपासून ही तिकिटे उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
या तिकिटांद्वारे नागरिकांना दिल्लीत होणारे तीन महत्त्वाचे कार्यक्रम लाईव्ह पाहता येतील:
१. प्रजासत्ताक दिन संचलन (२६ जानेवारी): यात देशाची लष्करी ताकद, विविध राज्यांचे चित्ररथ आणि चित्तथरारक फ्लायपास्ट पाहता येईल.
२. फुल ड्रेस रिहर्सल (२८ जानेवारी): मुख्य संचलनाची संपूर्ण रंगीत तालीम.
३. बीटिंग द रिट्रीट (२९ जानेवारी): भारतीय वाद्यांच्या संगीतमय धूनचा समारोप सोहळा.
प्रजासत्ताक दिन संचलन: २० रुपये किंवा १०० रुपये.
फुल ड्रेस रिहर्सल: २० रुपये.
बीटिंग द रिट्रीट: १०० रुपये.
तिकिटांची विक्री ५ ते १४ जानेवारी दरम्यान (जागा शिल्लक असेपर्यंत) सकाळी ९ वाजल्यापासून ऑनलाइन उपलब्ध असतील.
यासाठी ऑनलाइन बुकिंगची सुविधा दिली आहे. नागरिक आमंत्रणच्या अधिकृत पोर्टल www.aamantran.mod.gov.in वर सहजपणे बुक करू शकतात. ही सुविधा संपूर्ण भारतातील लोकांना रांगेत न थांबता उपलब्ध आहे.
तिकीट खरेदी करताना आणि सोहळ्याच्या दिवशी सोबत आधार कार्ड, मतदार ओळखपत्र किंवा पासपोर्ट यांपैकी कोणतेही एक मूळ फोटो ओळखपत्र असणे बंधनकारक आहे. अधिक माहिती आणि ताज्या अपडेट्ससाठी नागरिक rashtraparv.mod.gov.in या संकेतस्थळाला भेट देऊ शकतात.