PM Modi Mother AI video
पाटणा : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या दिवंगत आई हीराबेन मोदी यांचा एआय-जनरेटेड व्हिडिओ सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून तात्काळ हटवण्याचे निर्देश पाटणा उच्च न्यायालयाने आज (दि. १७) काँग्रेसला दिले.
१० सप्टेंबर रोजी बिहार काँग्रेसच्या एक्स हँडलवर एक पोस्ट शेअर करण्यात आली होती, ज्यामध्ये AI च्या माध्यमातून पंतप्रधान मोदी यांच्या स्वप्नात त्यांच्या आई आल्याचे दाखवले होते. या व्हिडिओमध्ये हीराबेन त्यांच्या मुलाला म्हणजे नरेंद्र मोदींना राजकीय फायद्यासाठी आपल्या नावाचा गैरवापर केल्याबद्दल फटकारताना दिसत आहे. एका दृश्यात, पंतप्रधान मोदींसारखा दिसणारा व्यक्ती अंथरुणावर झोपताना म्हणतो, 'आजची मतं चोरीला गेली, आता शांत झोप घे.' मग त्यांच्या स्वप्नात त्यांची आई येते आणि त्यांना फटकारते. व्हिडिओवर 'AI GENERATED' असे लिहिले असले तरी, भाजपने याला 'घृणास्पद आणि आईचा अपमान' म्हटले होते आणि या व्हिडिओविरोधात पटना उच्च न्यायालयात धाव घेतली होती. काँग्रेसने मात्र या पोस्टचा बचाव केला आणि म्हटले की हा पंतप्रधानांच्या राजकारणावर व्यंग्यात्मक दृष्टिकोन आहे.
दरम्यान, आज पटना उच्च न्यायालयाचे कार्यकारी मुख्य न्यायाधीश पी.बी. बाजंतरी यांच्या न्यायालयात झालेल्या सुनावणीत, न्यायालयाने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या दिवंगत आई हीराबेन मोदी यांचा अपमान करणारा हा व्हिडिओ तात्काळ सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून काढून टाकण्याचा आदेश दिला.
भाजपने आपल्या तक्रारीत दावा केला की, हा व्हिडिओ केवळ पंतप्रधानांची प्रतिमा खराब करणारा नाही, तर महिलांच्या प्रतिष्ठेचेही उल्लंघन करणारा आहे. दिल्ली पोलिसांनी १३ सप्टेंबर रोजी भाजप कार्यकर्ते संकेत गुप्ता यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला होता, ज्यात काँग्रेस नेत्यांवर कारवाईची मागणी केली आहे. एफआयआरमध्ये व्हिडिओ पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या आईची प्रतिमा बदनाम करणारा असल्याचे म्हटले आहे.