नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : कोरोना विषाणूवर नियंत्रण ठेवण्यासाठी लसींची निर्मिती करून जगात आपला ठसा उमटवल्यानंतर भारत पुन्हा एकदा नवीन लस बनवण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. झिका व्हायरस, फ्लू आणि रक्ताच्या कर्करोगापासून ग्रस्त रुग्णांसाठी नवीन लस विकसित करण्यासाठी भारताने प्रयत्न सुरू केले आहेत. यासाठी, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएमआरचा) पहिल्या टप्प्यातील चाचणीसाठी अनेक कंपन्यांसोबत सामंजस्य करार केले आहेत.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, या करारामुळे चार आशादायक अणुंसाठी (मोल्येक्युल) प्रथम-मानवी वैद्यकीय चाचण्यांमध्ये महत्त्वपूर्ण प्रवेश करता येईल. यामध्ये ओरिजन ऑन्कोलॉजी लिमिटेड सोबत मल्टिपल मायलोमासाठी लहान अणुंवर सहयोगी संशोधन, इंडियन इम्युनोलॉजिकल लिमिटेड सोबत झिका लस विकासासाठी भागीदारी, मायन्व्हॅक्स प्रायव्हेट लिमिटेड सोबत वातावरणीय बदलानुसार लागण होणाऱ्या विषाणुवरील लस चाचण्यांचे समन्वय आणि ल्युकोमियाच्या नवीन लक्षणांसाठी सीएआर-टी सेल थेरपी प्रगती अभ्यासासाठी इम्युनोॲक्टसह क्रॉनिक लिम्फोसायटिक रोगासंबंधी करार करण्यात आला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा यांनी आयसीएमआर तसेच प्रमुख उद्योग आणि शैक्षणिक भागीदार यांच्यातील धोरणात्मक सहकार्याचे कौतुक केले. ते म्हणाले की सर्व नागरिकांसाठी परवडणारे आणि सुलभ अत्याधुनिक उपचारांसाठी हा एक महत्त्वाचा टप्पा ठरेल.
प्रकल्पाच्या परिवर्तनीय क्षमतेवर भर देताना आयसीएमआरचे सचिव महासंचालक डॉ. राजीव बहल म्हणाले की, हे सहकार्य धोरणात्मकदृष्ट्या सार्वजनिक-खाजगी भागीदारीद्वारे भारतातील वैद्यकीय संशोधन पुढे नेण्यासाठी आमची वचनबद्धता दर्शवते. अणू आणि अत्याधुनिक उपचारांच्या विकासाला चालना देण्यासाठी पहिल्या टप्प्यातील वैद्यकीय ट्रायल इन्फ्रास्ट्रक्चरची स्थापना हा महत्त्वाचा घटक असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. नाविन्यपूर्ण आणि परवडणाऱ्या आरोग्यसेवा उपायांच्या विकासात भारत पुढे जात राहील याची खात्री करण्यासाठी या नेटवर्कचा आणखी विस्तार करणे हे आमचे ध्येय आहे.
पहिल्या टप्प्यातील वैद्यकीय चाचण्यांसाठी आयसीएमआरसोबत केईएम रुग्णालय आणि जीएसएम रुग्णालय मुंबई, एसीटीआरईसी नवी मुंबई, एसआरएम एमसीएच आणि आरएच कट्टनकुलाथूर, पीजीआयईएमआर चंदीगडसह नेटवर्क तयार केले गेले आहे. हे नेटवर्क प्रारंभिक टप्प्यातील वैद्यकीय चाचण्या करण्यासाठी भारताची क्षमता तयार करण्यासाठी आणि वाढविण्यासाठी तयार केले आहे.