पुढारी ऑनलाईन डेस्क : काँग्रेस नेते राहुल गांधी यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मानहानीच्या खटल्याप्रकरणी पुण्यातील विशेष न्यायालयाने त्यांना शुक्रवारी (दि.१०) जामीन मंजूर केला. राहुल गांधींविरुद्ध हा खटला विनायक दामोदर सावरकरांच्या नातवाने दाखल केला आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी १८ फेब्रुवारी रोजी होणार आहे.
मानहानीच्या या प्रकरणामध्ये राहुल गांधी यांनी मार्च २०२३ मध्ये लंडनमध्ये हिंदुत्ववादी विचारवंत सावरकर यांच्याविरुद्ध आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यानंतर सावरकरांच्या नातवाने पुण्यात त्यांच्याविरूध्द मानहानीचा खटला दाखल केला. आता न्यायालय या प्रकरणाची सुनावणी करत आहे.
राहुल गांधी परदेश दौऱ्यावर असल्याने त्यांच्या वकिलाने आजच्या सुनावणीला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी होण्याची परवानगी न्यायालयाकडे मागितली होती. न्यायालयाने ती मंजूर केली. राहुल गांधी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणीला उपस्थित राहिले असल्याचे समजते.