Campa vs. FSSAI
नवी दिल्ली : कॅम्पा ब्रँडच्या पेयांची ‘एनर्जी ड्रिंक’ म्हणून विक्री करण्यास निर्बंध घातल्याने उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजने भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणावर (FSSAI) खटला दाखल केला आहे.
उच्च कॅफीनयुक्त पेयांवर ‘एनर्जी ड्रिंक’ हे लेबल वापरण्यास मनाई करणाऱ्या FSSAI च्या आदेशाला रिलायन्सने आव्हान दिले आहे. त्यामुळे पेय उत्पादक कंपन्यांविरोधातील FSSAI च्या लेबलिंग कारवाईला आव्हान देणारी रिलायन्स ही आणखी एक मोठी कंपनी ठरली आहे.
रॉयटर्सने मंगळवारी प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, रिलायन्स कन्झ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेडने १ ऑक्टोबर रोजी यासंदर्भात याचिका दाखल केली आहे. कंपनीने ३० जून रोजी FSSAI ने जारी केलेल्या आदेशाला या याचिकेद्वारे आव्हान दिले आहे. या आदेशानुसार, अधिक प्रमाणात कॅफीन असलेल्या पेयांची ‘एनर्जी ड्रिंक’ म्हणून विक्री किंवा मार्केटिंग करण्यावर उत्पादकांना निर्बंध घालण्यात आले आहेत.
गेल्या आठवड्यात अन्न सुरक्षा नियामकाच्या कारवाईविरोधात खटला दाखल करणाऱ्या पेप्सिको आणि मॉन्स्टर बेव्हरेज या कंपन्यांच्या पंक्तीत आता रिलायन्सही सामील झाली आहे. ऑस्ट्रियाच्या रेड बुलला तात्पुरता दिलासा देण्यात आला असून, कंपनीला हे लेबल वापरणे सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे.
रिलायन्सने दाखल केलेल्या याचिकेनुसार, FSSAI च्या आदेशानंतर राज्यातील अधिकाऱ्यांनी कंपनीचा साठा जप्त केला. तसेच ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मना संबंधित उत्पादने त्यांच्या संकेतस्थळांवरून हटवण्याचे निर्देश देण्यात आले. त्यामुळे कंपनीने FSSAI चा हा आदेश रद्द करण्याची मागणी न्यायालयाकडे केली आहे.
रिलायन्सच्या पेय व्यवसायाचा भाग असलेल्या रिलायन्स कन्झ्युमर प्रॉडक्ट्सने न्यायालयात दाखल केलेल्या कागदपत्रांमध्ये या कारवाईमुळे कंपनीच्या व्यवसायावर मोठा परिणाम होत असल्याचे म्हटले आहे. "या कारवाईमुळे कंपनीच्या व्यवसायाच्या कामकाजात मोठ्या प्रमाणात अडथळे निर्माण झाले असून, बाजारपेठेतील उपस्थिती आणि व्यावसायिक विश्वासार्हतेवरही विपरीत परिणाम होत असल्याचा दावा कंपनीने केला आहे."