नवी दिल्ली :भारत आणि चीनमधील संबंध हळूहळू सुधारत आहेत. सीमेवरील तणाव कमी झाला आहे. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी लोकसभेत भारत-चीन सीमा वादाच्या सद्यस्थितीची माहिती देशाला दिली. सीमेवर पूर्ण शांतता असल्याशिवाय दोन्ही देशांमधील संबंध सामान्य होऊ शकत नाहीत, असेही जयशंकर म्हणाले.
परराष्ट्रमंत्र्यांनी सांगितले की, पूर्व लडाखमध्ये ४ वर्षांपासून सीमावादावरून तणाव होता. हा तणाव संपवण्यासाठी, दोन वर्षांच्या दीर्घ चर्चेनंतर एक करार झाला. त्यानंतर दोन्ही देशांच्या सैन्याने विवादित ठिकाणाहून माघार घेतली. सीमावर्ती भागात शांतता असल्याशिवाय भारत-चीन संबंध पूर्णपणे सामान्य होऊ शकत नाहीत, असे परराष्ट्रमंत्र्यांनी सभागृहात सांगितले. दोन्ही देशांमधील वाद राजनैतिक पातळीवर सोडवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. दोन्ही देशांच्या सैन्याने पूर्व लडाखमधील वादग्रस्त जागेवरून माघार घेतली आहे. मात्र, अजूनही सीमेवर अनेक भागात वाद सुरू आहेत. भारताला परस्पर सामंजस्याने यावर तोडगा काढायचा आहे.
परराष्ट्र मंत्र्यांनी सांगितले की, भारत आणि चीनने सीमा प्रश्न सोडवण्यासाठी अनेक दशकांपासून चर्चा केली आहे. एप्रिल-मे २०२० मध्ये पूर्व लडाखमधील एलएसीवर चीनच्या बाजूने मोठ्या संख्येने सैन्य जमा केल्यानंतर अनेक ठिकाणी भारतीय सैन्यासोबत सामना झाला. या परिस्थितीमुळे गस्तीच्या कामातही अडथळा निर्माण झाला. आव्हाने आणि कोविड परिस्थिती असूनही आपल्या जवानांनी २०२० मध्ये जलद आणि प्रभावी प्रतिसाद दिल्याचे त्यांनी सांगितले. या घटनेचा दोन्ही देशांतील संबंधांवर खोलवर परिणाम झाल्याचे ते म्हणाले.
जयशंकर म्हणाले की, १९८८ पासून भारत आणि चीनमधील सीमा विवाद संवादाद्वारे सोडवण्यासाठी आणि शांतता राखण्यासाठी अनेक करार केले आहेत. परंतु २०२० च्या घटनांमुळे या प्रयत्नांचे नुकसान झाले. या वर्षी २१ ऑक्टोबर रोजी भारत आणि चीनच्या सैन्याने विवादित पूर्व लडाखमधील डेपसांग आणि डेमचोक भागातून माघार घेण्यास सुरुवात केली आणि नोव्हेंबर महिन्यापूर्वी ती पूर्ण झाल्याचे त्यांनी सांगितले.