Delhi Blast Reddit Post:
दिल्लीतील लाल किल्ला परिसरात सोमवारी (दि. १० नोव्हेंबर) च्या संध्याकाळी आय २० गाडीत स्फोट झाला होता. त्यात आतापर्यंत १२ लाकोचां मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाले आहेत. या स्फोटानंतर दिल्ली पोलीस अन् तपास यंत्रणांनी सर्व भाग सील केला होता. आता या घटनेचा तपास हा गृहमंत्रालयानं एएनआयकडं सुपर्द केला आहे.
दरम्यान, या घटनेपूर्वीच Reddit या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील एक पोस्ट सध्या चर्चेत आली आहे. ही पोस्ट दिल्ली स्फोटाच्या काही तास आधीच करण्यात आली होती. विशेष म्हणजे ही पोस्ट एका बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यानं केली आहे.
या पोस्टचा मथळा हा 'दिल्लीत काहीतरी होत आहे का?' असा होता. Reddit वरील ही पोस्ट साधारणपणे दुपारी ४ वाजता करण्यात आली होती. त्यानंतर तीन तासानं दिल्लीच्या लाल किल्ला परिसरात आय २० गाडीत स्फोट झाला.
हा बारावीत शिकणारा विद्यार्थी आपल्या पोस्टमध्ये लिहितो, 'मी माझ्या शाळेतून घरी परत येत होतो. मी खोटं बोलत नाही लाल किल्ला परिसरातील मेट्रो स्टेशन जवळ सर्वत्र पोलीस अन् लष्कराचे जवानच दिसत आहेत. मी मेट्रोमधून देखील प्रवास केला त्यावेळी नेहमीपेक्षा जास्त लष्कराचे जवान पाहिले. आज असं काय विशेष आहे. काय सुरू आहे?'
या पोस्टनंतर काही तासातच लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या सिग्नलवर मोठा स्फोट झाला. त्यानंतर या Reddit post च्या टायमिंगची सर्वत्र चर्चा सुरू आहे. Reddit आणि ट्विटरवरील युजर ही पोस्ट आणि घटलेल्या घटनेबाबत चर्चा करत आहेत.
सर्व शक्यता तपासणार : शहा
दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की याबाबत एनआयए, आयबी आणि दिल्ली पोलीसांचे दहशतवादी विरोधी पथक याची तपासणी करत आहेत. शहा यांनी या घटनेचे सर्व शक्य अँगल्स तपासले जातील असं सांगितलं. सध्या तरी कोणतीही थेअरी नाकारता येत नाही असंही ते म्हणाले.
सुरूवातीच्या मिळालेल्या माहितीनुसार फॉरेन्सिक तपासणीसाठी स्फोट झालेली साईट सील करण्यात आली आहे. त्यानंतर तपास यंत्रणा पुरावे गोळा करतील. त्याचबरोबर या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज देखील तपासण्यात येत आहे.