Delhi Blast | स्फोटके खरेदीसाठी चार डॉक्टर्सनी जमविले 26 लाख रुपये 
राष्ट्रीय

Delhi Blast | स्फोटके खरेदीसाठी चार डॉक्टर्सनी जमविले 26 लाख रुपये

तपासादरम्यानची माहिती; स्फोटकासाठी तीन लाखांची खत खरेदी

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : लाल किल्ला स्फोटाच्या चौकशीत अटक केलेल्या डॉक्टरांनी स्फोटके आणि खतांचा साठा खरेदी करण्यासाठी 26 लाख रुपये गोळा केल्याचे उघड झाले आहे.

व्हाईट कोट दहशतवादी मॉड्यूलशी संबंधित अटक केलेल्या डॉक्टरांच्या तपासात घातपाती कारवायाच्या योजनांची माहिती समोर येत आहे. या चार डॉक्टर्सनी लाल किल्ल्याजवळ झालेल्या शक्तिशाली स्फोटात वापरलेले साहित्य खरेदी करण्यासाठी 26 लाख रुपयांहून अधिक रक्कम जमवली होती, असे एका अधिकार्‍याने गुरुवारी सांगितले.

डॉ. मुझम्मिल गनी, डॉ. आदिल अहमद राथेर, डॉ. शाहीन सईद आणि डॉ. उमर नबी या चार संशयितांनी ही रक्कम रोख स्वरूपात जमा केली होती. ती सुरक्षिततेसाठी आणि कारवाया अंमलात आणण्यासाठी डॉ. उमरला देण्यात आली होती, असे या अधिकार्‍याने सांगितले. या सर्वांनी जमा केलेला हा पैसा मोठ्या दहशतवादी कटासाठी वापरण्यात येणार होता. या गटाने गुरुग्राम, नूह व जवळच्या शहरांमधील पुरवठादारांकडून सुमारे 3 लाख रुपयांचे सुमारे 26 क्विंटल एनपीके खत खरेदी केल्याचा आरोप आहे.

स्फोटाच्या आदल्या दिवशी उमर आणि मुझम्मिलमध्ये वाद

सूत्रांनी असेही सांगितले की, दिल्लीत घडविण्यात आलेल्या स्फोटाच्या आदल्या दिवशी उमर आणि मुझम्मिलमध्ये हा पैसा कसा वापरायचा यावरून वाद झाला होता. या वादाचा नियोजित कटावर किंवा हल्ला घडवून आणण्याच्या वेळेवर परिणाम झाला का, या अनुषंगानेही तपास करण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT