उमेश कुमार
नवी दिल्ली : सोमवारी संध्याकाळी राष्ट्रीय राजधानीतील प्रसिद्ध लाल किल्ल्याजवळ झालेल्या कार बॉम्बस्फोटामुळे देशाच्या सुरक्षा आणि गुप्तचर यंत्रणेतील गंभीर त्रुटी उघड झाल्या आहेत. दिल्लीला लागून असलेल्या फरिदाबादमध्ये सुमारे 2,900 किलोग्रॅम स्फोटके सापडल्यानंतर राजधानी हायअलर्टवर असताना ही घटना घडली.
संशयिताने फरिदाबादहून स्फोटकांनी भरलेली कार दिल्लीपर्यंत चालवली आणि सुमारे तीन तास लाल किल्ल्याजवळील पार्किंगमध्ये ठेवली. त्यानंतर सोमवारी संध्याकाळी 6.52 वाजता कारमध्ये स्फोट झाला. दरम्यान, ज्या कारमध्ये फरिदाबादहून स्फोटके आणली गेली त्याच वाहनात स्फोट झाल्याचे मानले जाते.
पोलिस तपासात असे दिसून आले आहे की, हे संपूर्ण नेटवर्क पुलवामा येथील डॉ. उमर मोहम्मदसह एका कथित ‘व्हाईट कोट दहशतवादी मॉड्यूल’शी जोडलेले आहे. तो फरिदाबादमध्ये पोलिस कारवाईतून सुटला आणि घाबरून त्याने स्फोटके दिल्लीला नेली. असे असले तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी अद्याप या घटनेला दहशतवादी हल्ला, असे संबोधलेले नाही. सोमवारी रात्री अमित शहा यांनी सांगितले की, स्फोटाचे स्वरूप तपासानंतरच निश्चित केले जाईल आणि सर्व शक्यता तपासल्या जातील.
लाल किल्ल्याच्या सुरक्षेची जबाबदारी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाकडे (सीआयएसएफ) आहे. दिल्ली पोलिस लाल किल्ल्याच्या बाह्य परिसरावर लक्ष ठेवतात; परंतु लाल किल्ल्याच्या प्रवेशद्वारावर, आतील भागात आणि सभोवतालच्या उंच सीमा भिंतीच्या सुरक्षेची जबाबदारी ‘सीआयएसएफ’कडे आहे. पूर्वी, काही लष्करी तुकड्या लाल किल्ल्याच्या आतदेखील तैनात होत्या; परंतु त्यांच्या छावण्या आता किल्ल्याच्या आत नाहीत. त्या खूप पूर्वीच स्थलांतरित करण्यात आल्या आहेत.