राष्ट्रीय

महाराष्ट्रासह ८ राज्यांत ५ दिवस उष्णतेचा ‘रेड अलर्ट’

Arun Patil

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : उत्तर भारतातील बहुतांश राज्ये कडक उन्हाने पोळून निघत आहेत. महाराष्ट्रातील काही भागांसह दिल्ली, हरियाणा, पंजाब, उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये पुढील 5 दिवस उन्हाचा तडाखा कायम राहील, असा 'रेड अलर्ट' हवामान खात्याने जारी केला आहे.

राजस्थानमध्ये जालौर, बेलोत्रा आदी ठिकाणी मिळून उष्माघाताने आजअखेर 8 जणांचा मृत्यू झाला आहे. बाडमेरमध्ये सलग दुसर्‍या दिवशी तापमान 48 अंशांच्या पुढे राहिले. येथे कमाल तापमान 48.8 अंश नोंदविले गेले. भारत-पाकिस्तान सीमेवर तापमान तब्बल 53 अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे. जैसलमेरची लाहीलाही झाली आहे. गुजरातमार्गे महाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागात अफगाणिस्तान, पाकिस्तानातून येणार्‍या उष्ण वार्‍याने उष्म्याची तीव्रता वाढलेली आहे. राजस्थानमध्ये विजेचा वापर 20 टक्क्यांनी वाढला आहे गौतम बुद्धनगर जिल्हा प्रशासनाने नोएडा आणि ग्रेटर नोएडामधील सर्व शाळांतील 9 वी ते 12 वीच्या विद्यार्थ्यांना सुट्टी जाहीर केली आहे.

भाजीपाला, कडधान्ये महाग

उष्णतेमुळे भाजीपाला आणि डाळींचे वाढलेले दर पुढील महिन्यातही कायम राहतील. बटाटे, टोमॅटो, कांद्याचे दर वाढले आहेत. एप्रिलमधील भाज्यांचे दर गेल्यावर्षीच्या तुलनेत सरासरी 27.8 टक्क्यांनी जास्त आहेत. जुलै-ऑगस्टपासून दिलासा शक्य आहे.

पश्चिम बंगालमध्ये रेमल चक्रीवादळ उद्या धडकणार

बंगालच्या उपसागरात तयार होत असलेले रेमल चक्रीवादळ रविवारी (26 मे) पश्चिम बंगाल आणि बांगला देशला धडकणार आहे. खबरदारीचा उपाय म्हणून मच्छीमारांना आतापासून किनारपट्टीपासून दूर राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

'रेमल' चक्रीवादळामुळे मतदानावर परिणाम होणार

नवी दिल्ली : पश्चिम बंगालच्या खाडीत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे 'रेमल' नावाचे भयंकर चक्रीवादळ 26 मे रोजी बंगालच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता असल्याचा इशारा भारतीय वेधशाळेने दिला आहे. चक्रीवादळात ताशी 80 ते 100 किलोमीटर प्रतितास क्षमतेने वारे वाहणार आहेत. पश्चिम बंगालमधील आठ मतदारसंघांत उद्या शनिवारी होणार्‍या सहाव्या टप्प्यातील मतदानावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता असल्याचे वेधशाळेने म्हटले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT