नवी दिल्ली; वृत्तसंस्था : भारतीय रिझर्व्ह बँक (आरबीआय) शनिवार, 4 ऑक्टोबरपासून त्यांच्या चेक क्लिअरन्स सिस्टीममध्ये एक मोठा बदल राबवत आहे. या योजनेंतर्गत चेक जमा केल्यानंतर काही तासांत प्रक्रिया केली जाईल आणि तुमच्या खात्यात जमा केले जातील. यापूर्वीच्या पद्धतीनुसार सध्या चेक क्लिअर होण्यासाठी दोन दिवस लागतात.
या नवीन प्रणालीला सतत क्लिअरिंग आणि सेटलमेंट असे म्हणतात. एकदा अमलात आणल्यानंतर बँका काही तासांत चेक स्कॅन करतील, सादर करतील आणि क्लिअर करतील. हे सर्व काम बँक कामकाजाच्या वेळेत केले जाईल. याची बँकांनी आजपासून चाचणी सुरू केली आहे. चेक मिळाल्यावर बँक या तपशिलांची पडताळणी करेल. जर सर्व काही जुळले तर चेक क्लिअर केला जाईल; अन्यथा तो नाकारला जाईल. अशा परिस्थितीत तुम्हाला तपशील पुन्हा प्रविष्ट करावे लागतील. जर पुरेशा रकमेअभावी चेक बाऊन्स झाला तर ग्राहकांना चेक बाऊन्स चार्जेसचा भुर्दंड बसू शकतो.
एचडीएफसी बँक आणि आयसीआयसीआय बँकेसह खासगी बँकांनी घोषणा केली आहे की, 4 ऑक्टोबरपासून चेक सेटलमेंट एकाच दिवशी होईल. दोन्ही बँकांनी ग्राहकांना चेक बाऊन्स होण्यापासून रोखण्यासाठी त्यांच्या खात्यात पुरेशी शिल्लक ठेवण्याचा सल्ला दिला आहे. विलंब किंवा नकार होऊ शकतो म्हणून त्यांनी सर्व चेक तपशील योग्यरीत्या भरण्याचे आवाहन देखील केले आहे.
बँकांनी ग्राहकांना सुरक्षितता वाढवण्यासाठी पॉझिटिव्ह पे सिस्टीम वापरण्याचे आवाहन केले आहे. या सिस्टीम अंतर्गत 50 हजारपेक्षा जास्त रकमेचे चेक जमा करण्यापूर्वी बँकेला काही महत्त्वाची माहिती देणे आवश्यक आहे. यामध्ये तुम्हाला तुमचा खाते क्रमांक, चेक क्रमांक, तारीख, रक्कम आणि ज्या व्यक्तीला तुम्ही चेक देत आहात, त्याचे नाव बँकेला किमान 24 कामकाजाचे तास आधी कळवावे लागेल.
सीटीएस ही एक अशी प्रणाली आहे, जी चेकच्या भौतिक प्रती पुढे-मागे पाठवण्याची गरज दूर करते. चेक स्कॅन करून डिजिटल प्रतिमा तयार केल्या जातात, ज्या नंतर एका बँकेतून दुसर्या बँकेत पाठवले जातात. यामुळे चेक प्रत्यक्ष हस्तांतरित करण्याची गरज दूर होते. परंतु जेव्हा ड्रॉप बॉक्स किंवा ऑटोमेटेड टेलर मशिनमध्ये जमा केले जातात, तेव्हा सेटलमेंटला सामान्यतः दोन कामकाजाचे दिवस लागतात. आता प्रक्रिया जलद करण्यासाठी आरबीआयने सिस्टीमला अधिक सुलभ केले आहे.
जर तुम्ही सकाळी 10 ते सायंकाळी 4 च्या दरम्यान चेक जमा केला तर तो ताबडतोब स्कॅन केला जाईल आणि क्लिअरिंगसाठी पाठवला जाईल. बँकांमध्ये सेटलमेंट सकाळी 11 पासून तासाभराने होईल. ज्या बँकेला पेमेंट करायचे आहे, त्यांनी संध्याकाळी 7 पर्यंत पुष्टी करणे आवश्यक आहे. जर त्यांनी प्रतिसाद दिला नाही तर चेक आपोआप मंजूर होईल.
पहिला टप्पा : 4 ऑक्टोबर 2025 ते 2 जानेवारी 2026 पर्यंत, बँकांना संध्याकाळी 7 वाजेपर्यंत चेकची पुष्टी करावी लागेल.
दुसरा टप्पा : 3 जानेवारी 2026 पासून बँकांना फक्त 3 तासांत प्रतिसाद द्यावा लागेल.