Rivaba Jadeja Minster :
भारताचा स्टार अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजाची पत्नी रिवाबा ही २०२२ मध्ये भाजपच्या तिकीटावर जामनगरमधून आमदार म्हणून निवडून आली होती. आता तिच्या गळ्यात मंत्रीपदाची माळ पडली आहे. रिवाबाला राजकारणात येऊन फक्त ३ वर्षे झाली आहेत. त्यानंतर आता तिला गुजरातमधील भाजप सरकारमध्ये मोठी जबाबदारी मिळणार आहे.
रिवाबाचा जन्म ५ सप्टेंबर १९९० मध्ये झाला. तिनं गुजरातमधील राजकोट येथील इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्समधून मॅकेनिकल इंजिनिअरिंगची डिग्री घेतली आहे. १७ एप्रिल २०१६ मध्ये तिचे लग्न रविंद्र जडेजासोबत झालं. या लग्नाला अनेक सेलिब्रेटी उपस्थित होते.
रिवाबा ही काँग्रेसचे वरिष्ठ नेते हरी सिंह सोळंकी यांची नातेवाईक आहे. रिवाबा राजपूत समाजाची संघटना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या करणी सेनेची सदस्या देखील राहिली आहे. ती करणी सेना महिला शाखाची प्रमुख देखील होती. रिवाबानं २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला. रिवाबा ही जामनगर - सौराष्ट्र क्षेत्रात चांगलीच सक्रीय आहे. रविंद्र जडेजा हा मूळचा जामनगरचा आहे.
रिवाबा जडेजानं जामनगर उत्तरमधून निवडणूक लझवली होती. तिनं आम आदमी पक्षाचे उमेदवार करसन करमूर यांचा पराभव केला होता. तिनं हा पराभव ५३ हजार ५७० मतांनी केला. रिवाबासाठी रविंद्र जडेजा देखील प्रचाराच्या मैदानात उतरला होता. त्याचा रिवाबाला चांगला फायदा झाला.
याचबरोबर रिवाबाचा जनसंपर्क देखील चांगला असल्यानं तिला पहिल्याच निवडणुकीत यश मिळालं. आता पहिल्यांदा आमदार झाल्यावर तीन वर्षातच रिवाबाच्या गळ्यात मंत्रीपदाची माळ पडली आहे.