पुढारी ऑनलाईन डेस्क : झारखंडच्या जमशेदपूरमध्ये रविवारी संध्याकाळी राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे (Rashtriya Rajput Karni Sena) राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि झारखंड प्रदेशचे अध्यक्ष विनय सिंह (Vinay Singh) यांची गोळ्या मारुन हत्या करण्यात आली. ही घटना मानगो बालीगुमा भागातील एका धाब्याजवळ घडली. मोबाईल लोकेशनच्या आधारे त्यांचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला. त्याच्या डोक्याला गोळी लागली असून त्यांच्या डाव्या हातात पिस्तूल सापडली आहे. त्यांच्या हातावर आणि पायावर जखमांच्या अनेक खुणा आढळून आल्या आहेत.
विनय सिंह यांचा मृतदेह रविवारी संध्याकाळी जमशेदपूरच्या बालीगुमा परिसरातील एका पंजाबी ढाब्याजवळ आढळून आला. त्यांच्या डोक्यात गोळी लागली आहे. त्याच्या डाव्या हातात एक पिस्तूल आढळली असून ती जप्त करण्यात आली. शनिवारी सकाळपासून सिंह यांच्याशी संपर्क होत नव्हता. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांनी ते बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी त्यांचे मोबाईल लोकेशन ट्रेस केले आणि घटनास्थळावरुन त्यांचा मृतदेह ताब्यात घेतला.
पीटीआयने एका पोलिस अधिकाऱ्याच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, सिंह आणि इतर काहीजण घरी परतत असताना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३३ वरील एका धाब्याजवळ बंदूकधाऱ्यांनी त्यांच्या गोळीबार केला. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.
"विनय सिंह शनिवारी सकाळी घराबाहेर पडले होते. त्याच्या कुटुंबीयांनी ते बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसात नोंदवली. रविवारी संध्याकाळी त्याचा मृतदेह जवळच्या शेतात आढळून आला. त्याच्या डाव्या हातात एक देशी बनावटीची पिस्तूल होती. त्याची मोटारसायकलही ताब्यात घेण्यात आली आहे. या प्रकरणी तपास सुरु आहे," असे डीएसपी बचन देव कुजूर यांनी सांगितले.
सिंह यांच्या मृत्यूच्या वृत्तानंतर त्यांच्या समर्थकांनी आक्रोश करत रविवारी रात्री जमशेदपूरला कोलकाता आणि ओडिशापासून जोडणारा महत्त्वाचा मार्ग डिमना चौकाजवळ रोखून धरला. करणी सेनेच्या सदस्यांनी या हत्येसाठी जबाबदार असलेल्यांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली. यामुळे महामार्गावरील वाहतूक जवळपास दोन तास ठप्प झाली होती. ही कट रचून केलेली हत्या असल्याचे सांगत या घटनेच्या तपासासाठी पोलिसांनी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केले आहे. घटनास्थळाचे सीसीटीव्ही फुटेजही तपासण्यास सुरुवात केली आहे. जर ४८ तासांत मारेकऱ्यांना अटक केली नाही तर तीव्र आंदोलन आणि झारखंड बंदचा इशारा करणी सेनेच्या नेत्यांनी दिला आहे.
याआधी करणी सेनेचे अध्यक्ष सुखदेव सिंह गोगामेडी यांची डिसेंबर २०२३ मध्ये त्यांच्या राहात्या घरात गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. या हत्येनंतर लगेचच लॉरेन्स बिश्नोई गँगचा सदस्य रोहित गोदारा याने या गुन्ह्याची जबाबदारी स्वीकारली होती.