Rapido rider viral chat
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर 'अनुष्का' नावाच्या एका युजरने शेअर केलेली पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. रॅपिडोवरून प्रवास पूर्ण झाल्यानंतर संबंधित रायडरने तिला व्हॉट्सॲपवर मेसेज केल्याचा धक्कादायक प्रकार तिने समोर आणला आहे.
अनुष्काने तिच्या पोस्टमध्ये नमूद केले आहे की, गंतव्यस्थानी सोडल्यानंतर रायडरने व्हॉट्सॲपवर तिच्याशी संपर्क साधला आणि विचित्र पद्धतीने संवाद सुरू केला. तिने या संभाषणाचे स्क्रीनशॉट देखील शेअर केले आहेत.ही पोस्ट सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाली असून, प्रवासानंतर रायडरला तिचा मोबाईल नंबर कसा मिळाला, याबद्दल अनेकांनी चिंता व्यक्त केली आहे. या घटनेमुळे युजर्सची गोपनीयता (Privacy) आणि रायडरच्या वर्तणुकीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर रॅपिडो कंपनीने कमेंट सेक्शनमध्ये या प्रकरणाची दखल घेतली. कंपनीने या घटनेबद्दल खेद व्यक्त करत अशा प्रकारचे वर्तन अस्वीकार्य असल्याचे म्हटले आहे. रॅपिडोच्या वतीने सांगण्यात आले की, "कॅप्टनच्या (रायडर) या अयोग्य वर्तनाबद्दल आम्ही माफी मागतो. हे आमच्या सेवा मानकांचे उल्लंघन आहे."तसेच, या प्रकरणाची तातडीने चौकशी करून कठोर कारवाई करता यावी यासाठी कंपनीने संबंधित युजरला तिचा नोंदणीकृत मोबाईल नंबर आणि 'राईड आयडी' डायरेक्ट मेसेज (DM) द्वारे शेअर करण्याची विनंती केली आहे.
या घटनेमुळे राईड-हेलिंग (टॅक्सी/बाईक सेवा) प्लॅटफॉर्म वापरताना सुरक्षितता आणि डेटा प्रायव्हसीबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. प्रवास संपल्यानंतर कोणत्याही प्रवाशाच्या वैयक्तिक संपर्काचा गैरवापर होऊ नये, अशी मागणी अनेक युजर्सनी केली आहे.