अमर खोत
कोलकाताच्या आर. जी. कर वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात ३१ वर्षीय महिला डॉक्टरवर झालेल्या क्रुर बलात्कार आणि हत्येच्या निषेधार्थ देशभरातील शेकडो महिला रस्त्यावर उतरल्या होत्या. बुधवारी (दि.१४) रात्री ११.५५ वाजता कोलकातासह सबंध देशात आंदोलन सुरू होते. तपासातील दिरंगाईमुळे निदर्शनाचे रुपांतर आंदोलनात झाले.
आंदोलकांनी केजी कर रुग्णालयातील इमेर्जेंसी वॉर्ड मध्ये मोठ्या प्रमाणात तोडफोड केली. रुग्णालयाचे गेट तोडून आंदोलनकारी आत मध्ये घुसले होते. यावेळी मुख्यत्वे पोलिस आणि रोडवरील त्यांची वाहने निशाण्यावर होती. आंदोलनकाऱ्यांनी पोलिसांवर मोठ्या प्रमाणात दगडफेक देखील केली. घटनास्थळी आंदोलक आजादी चे नारे देत होते, तसेच 'रिक्लेम दी नाईट' आणि 'पीडितेला वाचवा, बलात्काऱ्याला नव्हे' असे लिहिलेले फलक त्यांच्या हातात होते. यावेळी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांची अतिरिक्त कुमक आणि राखीव पोलिस दलांना घटनास्थळी पाचारण करण्यातआले होते. पोलिसांनी घटनास्थळीअश्रूधुराचा मारा करत लाठीमार देखील केला. पण आंदोलकांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात असल्यामुळे पोलिस त्यांच्यापुढे हतबल होते.
पश्चिम बंगालमध्ये बलात्कार-हत्या घटनेच्या विरोधात 'रिक्लेम दी नाईट' आंदोलन विविध ठिकाणी करण्यात आले. जादवपूर, कोलकाता आणि सिलिगुडी येथे महिलांच्या नेतृत्वाखाली आंदोलनकाऱ्यांसह कोलकात्याच्या श्यामबाजार भागात मोठ्या प्रमाणात निदर्शने झाली.पीडितेला न्याय मिळावा या मागणीसाठी कोलकाता, दिल्ली आणि देशभरताली विविध शहरांमधील अनेक महिला कँडल मार्च काढत शांततापूर्ण मार्गाने निदर्शन करत होत्या. बंगाली माध्यमांतील बातम्यांनुसार, आर. जी. कर बलात्कार घटनेच्या पार्श्वभूमीवर संशोधक विद्यार्थीनी रिमझिम सिन्हा यांनी सर्वप्रथम 'रिक्लेम द नाईट' आंदोलनाचे जनतेलाआवाहन केले होते.
या निदर्शनाची मुळे १९७० च्या दशकात उगम पावलेल्या 'रिक्लेम द नाईट' चळवळीत खोलवर रुजलेली आहेत. ही चळवळ सार्वजनिक ठिकाणी, विशेषतः रात्रीच्या वेळी, महिलांच्या सुरक्षिततेच्या आणि स्वातंत्र्याच्या अधिकाराची शाश्वती देण्याचप्रयत्न करणारी आहे. पहिल्या 'रिक्लेम द नाईट' मोर्चाचे श्रेय बहुधा १९७७ मध्ये इंग्लंडमधील लीड्सला दिले जाते. जिथे महिलांनी लैंगिक हिंसाचाराच्या विरोधात आणि हल्ला टाळण्यासाठी महिलांनी रात्री घरातच राहावे असे सुचवणाऱ्या प्रचलित मानसिकतेविरुद्ध निषेध दर्शवलाहोता.
कोलकाता उच्च न्यायालयाने सीबीआय ला पोलिसांकडून तपास हस्तांतरित करण्याचे आदेश दिले होते. सद्यपरिस्थिीला सीबीआय घटनेचा तपास करत आहे. पोलिसांनी पिडीतेचा अनैसर्गिकरित्या मृत्यूचा गुन्हा नोंदवणे आणि महाविद्यालयाचे माजी प्राचार्य संदीप घोष यांचा जबाब नोंदवण्यास उशीर करण्याच्या कामावर खंडपीठाने प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. हेच कारण जनतेच्या असंतोषाला वाचा फोडणारे ठरले.या घटनेच्या निषेधार्थ फेडरेशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स असोसिएशनने (एफओआरडीए) आपला अनिश्चितकालीन संप पुकारला होता. पण केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांनी मागण्यांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर फोर्डाने संप मागे घेतला होता. त्यावेळी फेडरेशन ऑफ ऑल इंडिया मेडिकल असोसिएशनसह (एफएआयएमए.) इतर डॉक्टर संघटनांनी मागण्यांची अंमलबजावणी होईपर्यंत आणि ठोस तोडगा मिळेपर्यंत त्यांचा संप सुरूच ठेवणार असल्याचे सांगितले होते.
आंदोलन करणाऱ्या डॉक्टरांवर कोणतीही पोलिस कारवाई केली जाणार नसल्याचे जे.पी.नड्डा यांनी बैठकीत सांगितले होते. तत्पूर्वी निदर्शने आणि संप हे उच्च न्यायालयाच्या आदेशाच्या विरोधात आहेत आणि यामुळे न्यायालयाचा अवमान होऊ शकतो असे एम्सने सुचवले होते. आंदोलकांच्या आक्रमक पवित्र्यामुळे राजकीय वादंग सुरू झाला आहे. आरोपांच्या फैरी ऐकमेकांवर झाडण्याचे काम राजकीय पक्षांनी सुरू केले आहे. देशभरात स्वातंत्र्याच्या ७८व्या दिनाचा आनंद साजरा केला जातअसताना दुसऱ्या बाजूला कोलकातामध्ये प्रशासनाविरूद्ध रोष तीव्रतेने उफाळत आहे.