DK Shivakumar wedding gift remark on Ranya Rao gold smuggling case
बंगळूरू : कर्नाटकातील अभिनेत्री रान्या राव हिच्या सोनं तस्करी प्रकरणाने आता आणखीच नाट्यमय वळण घेतले आहे. या प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने (ED) कर्नाटकचे गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांच्या शैक्षणिक संस्थांवर छापे टाकल्याने एकच खळबळ उडाली. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी केलेल्या विधानाने चर्चांना आणखी उधाण आले आहे.
डी. के. शिवकुमार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, "मी गृहमंत्री परमेश्वर यांची भेट घेतली. तेव्हा ते म्हणाले की अभिनेत्री रान्या रावच्या लग्नाच्या वेळी त्यांनी तिला 'लग्नाचे गिफ्ट' दिली होती. आम्ही सार्वजनिक जीवनात आहोत, विविध संस्थांचे नेतृत्व करतो. लोकांना गिफ्ट देणे हे स्वाभाविक आहे. एखाद्याला 1, 10 किंवा 5-10 लाखांची भेट देणे यात काहीही चूक नाही."
अभिनेत्री रान्या राव हिला 3 मार्च रोजी दुबईहून बेंगळुरू विमानतळावर आल्यानंतर अटक करण्यात आली होती. तिच्याकडून तब्बल 12 किलो सोनं जप्त करण्यात आले होते. त्याची किंमत अंदाजे 12 कोटींहून अधिक होती. ही कारवाई महसूल गुप्तचर संचालनालय (DRI) ने केली.
ईडीच्या चौकशीत समोर आलेल्या माहितीनुसार, एका शैक्षणिक ट्रस्टकडून रान्या रावच्या क्रेडिट कार्ड बिलासाठी 40 लाखांचा पेमेंट करण्यात आला होता. हे पैसे गृहमंत्री परमेश्वर यांच्याशी संबंधित संस्थेच्या खात्यातून वळवण्यात आले असल्याचा संशय आहे. विशेष बाब म्हणजे या व्यवहारासाठी कोणतीही लेखी कागदपत्रे किंवा व्हाउचर्स उपलब्ध नाहीत, असे ईडीने सांगितले आहे.
या सर्व घडामोडींवर प्रतिक्रिया देताना गृहमंत्री जी. परमेश्वर यांनी सांगितले की, "ईडीच्या अधिकाऱ्यांनी आमच्या तीन शैक्षणिक संस्थांमध्ये व एका विद्यापीठात तपास केला आहे. मागील पाच वर्षांचे आर्थिक दस्तऐवज मागवण्यात आले आहेत. मी माझ्या कर्मचाऱ्यांना संपूर्ण सहकार्य करण्याचे आदेश दिले आहेत."
तसेच, 40 लाखाच्या व्यवहाराबाबत ते म्हणाले, "तपास पूर्ण झाल्यावरच मी या प्रकरणावर प्रतिक्रिया देईन. मी कायद्यावर विश्वास ठेवतो आणि चौकशीसाठी पूर्ण सहकार्य करेन."
अभिनेत्री रान्या रावने कोणतेही चुकीचे कृत्य केले असेल, तर त्यास कोणताही राजकीय पाठिंबा दिला जाणार नाही, असं स्पष्टीकरण डी. के. शिवकुमार यांनी दिले.
तथपि, 'लग्नाचे गिफ्ट' म्हणून इतकी मोठी रक्कम देण्यात आली असेल, तर यामागे कोणते संबंध आहेत, याची चौकशी होणे आवश्यक आहे, अशी मागणी विरोधकांकडून केली जात आहे.
रान्या रावला अटक होऊनही, तिला अद्याप COFEPOSA (विदेशी देवाणघेवाण व तस्करी प्रतिबंधक कायदा, 1974) अंतर्गत गुन्हा दाखल असल्यामुळे जामीन मिळालेला नाही. या कायद्यानुसार आरोपीला एक वर्षापर्यंत न्यायालयीन प्रक्रिया न ठेवता ताब्यात ठेवता येते.
सध्या रान्या रावने कोणाच्या सांगण्यावरून सोनं भारतात आणलं? या प्रकरणात आणखी कोण प्रभावशाली व्यक्ती सहभागी आहेत का? यावर तपास यंत्रणांचं लक्ष आहे.