पुढारी ऑनलाईन डेस्क : केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रोटोकॉल उल्लंघनाच्या आरोपांची आणि अभिनेत्री राण्या रावशी (ranya rao) संबंधित सोन्याच्या तस्करी प्रकरणात वरिष्ठ आयपीएस अधिकारी रामचंद्र राव यांचा सहभाग असल्याच्या आरोपांची चौकशी करण्याचे आदेश कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दिले आहेत. कर्नाटकचे अतिरिक्त मुख्य सचिव गौरव गुप्ता यांच्या नेतृत्वाखाली ही चौकशी केली जाईल. एका आठवड्यात अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. (Ranya Rao Smuggling Case)
सुरक्षा तपासणी टाळण्यासाठी आणि बेकायदेशीर कृत्यांमध्ये सहभागी होण्यासाठी राण्या राव यांनी विमानतळावरील व्हीआयपी सेवांचा गैरवापर केल्याच्या दाव्यांनंतर वाद निर्माण झाला होता. डीजीपी के रामचंद्र राव यांची सावत्र मुलगी राण्या राव हिने दुबईहून बेंगळुरूला सोने तस्करी करण्यासाठी त्यांच्या संबंधांचा फायदा घेतल्याचा आरोप केला आहे.
दुबईहून १४.८ किलो सोने आणल्याच्या आरोपाखाली महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) राण्या राव यांना अटक केली आहे. त्याचबरोबर वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात येणारे व्हीआयपी विशेषाधिकार तिच्या वडिलांनाही देण्यात आल्याचे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. ज्यामुळे सत्तेचा गैरवापर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राण्या राव यांनी विमानतळावर तपासणी टाळण्यासाठी आणि बेकायदेशीर कृत्ये करण्यासाठी त्यांच्या नावाचा आणि त्यांना देण्यात येणाऱ्या विशेष सेवांचा गैरवापर केला. या प्रकरणात विशेष सुविधा मिळवण्यामागे रामचंद्र राव यांची भूमिका तपासावी, असे आदेश सरकारने दिले आहेत.
कन्नड चित्रपट अभिनेत्री राण्या राव हिला सोमवारी (दि.3) रात्री केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर (केआयए) महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) अधिकाऱ्यांनी सोन्याच्या तस्करीच्या आरोपाखाली अटक केली होती. माणिक्य आणि पत्की सारख्या चित्रपटांमध्ये काम करणारी रान्या ही पोलिस महासंचालक (पोलिस गृहनिर्माण महामंडळ) रामचंद्र राव यांची मुलगी आहे. तिच्यावर १४.८ किलो सोने तस्करी केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.