रांची; वृत्तसंस्था : कोठडीत सुरक्षित ठेवलेला मुद्देमाल उंदरांनी नष्ट केल्याचा अजब दावा झारखंडमधील रांची पोलिसांनी केला आहे. जप्त केलेला तब्बल 200 किलो गांजा उंदरांनी खाल्ल्याचा दावा पोलिसांनी केल्याने ठोस पुराव्याअभावी न्यायालयाने अमली पदार्थ तस्करी प्रकरणातील मुख्य आरोपीची निर्दोष मुक्तता केली.
जानेवारी 2022 मध्ये ओरमांझी पोलिसांनी राष्ट्रीय महामार्ग क्र. 20 वर एका वाहनातून 1 कोटी रुपये किमतीचा 200 किलो गांजा जप्त केला होता. याप्रकरणी बिहारमधील वैशाली येथील इंद्रजित राय याला अटक करण्यात आली होती. मात्र, खटल्याच्या सुनावणीदरम्यान पोलिसांनी न्यायालयात सांगितले की, ठेवलेला सर्व गांजा उंदरांनी कुरतडून नष्ट केला आहे.
न्यायालयाने पोलिसांच्या या स्पष्टीकरणावर तीव्र नाराजी व्यक्त करत याला घोर निष्काळजीपणा म्हटले आहे. आरोपीला बेनिफिट ऑफ डाऊट देत सोडून देण्यात आले. मुद्देमाल सुरक्षित ठेवण्यात पोलीस अपयशी ठरल्याने तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.