पुढारी ऑनलाईन डेस्क : समाजवादी पार्टीचे खासदार रामजी लाल सुमन यांनी मेवाडचे शासक राणा सांगा यांच्यावरील वादग्रस्त विधानावरून करणी सेने आक्रमक भूमिका घेतली आहे. आज (दि.२६) सुमन यांच्या आग्रा येथील निवासस्थानी करणी सेनेच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला. कार्यकर्ते पोलिसांचे बॅरिकेड्स तोडून रामजी लाल सुमन यांच्या निवासस्थानी हल्ला करण्यासाठी पोहोचले. येथे मोठ्या प्रमाणात तोडफोड केली. यावेळी परिसरातील वाहनांचीही तोडफोड करण्यात आली. ( Rana Sanga Controversy)
आग्रा येथे खासदार रामजी लाल सुमन यांचे समर्थकांमध्ये आणि करणी सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारीही झाली. यावेळी पोलिसांवरही दगडफेक करण्यात आली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना लाठीमार करुन करणी सेनेच्या कार्यकर्त्यांना हुसकावले. या हल्ल्यात अनेक पोलिस जखमी झाले. पोलिसांनी करणी सेनेशी संबंधित अनेक समर्थकांना ताब्यात घेतले आहे. या हल्ल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. करणी सेनेचे कार्यकर्ते पोलिसांचा अडथळा उलथवून टाकताना दिसत आहेत. तर काही तोंडावर मास्क लावून तोडफोड करताना दिसतात. अखेर पोलिसांना लाठीमार करुन परिस्थिती नियंत्रणात आणावी लागली.
सोमवारी राजस्थान विधानसभेतही समाजवादी पक्षाचे (सपा) राज्यसभा सदस्य रामजी लाल सुमन यांनी राणा सांगा यांच्याबद्दल केलेल्या टिप्पणी मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. भाजप आमदार श्रीचंद कृपलानी यांनी संपूर्ण प्रकरणात कारवाईची मागणी केली.
राज्यसभा बोलताना समाजवादी पक्षाचे खासदार रामजी लाल सुमन म्हणाले होते की, इब्राहिम लोदी याला पराभूतकरण्यासाठी राणा सांगा हे भारतात बाबरला घेऊन आले होते. यावर उत्तर देताना काँग्रेस आमदार हरिमोहन शर्मा म्हणाले की, खासदारांच्या टिप्पणीवर सभागृहात चर्चा होऊ शकत नाही. भाजप आमदारांनी यावर तीव्र आक्षेप घेतला. राणा सांगा यांच्या अपमानावर चर्चा का होऊ शकत नाही, असा प्रश्न अनेक भाजप आमदारांनी उपस्थित केला. राणा सांगा यांच्यावरील आक्षेपार्ह वक्तव्याचे काँग्रेस समर्थन करत आहे का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. यावरून सभागृहात गदारोळ झाला होता.
समाजवादी पक्षाचे (सपा) राज्यसभा सदस्य रामजी लाल सुमन यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करत सर्व हिंदू समाज, विश्व हिंदू परिषद (VHP) आणि बजरंग दलाच्या सदस्यांनी मंगळवारी अनेक ठिकाणी निदर्शने केली. या मुद्द्यावर जयपूर, बिकानेर, अजमेरसह अनेक ठिकाणी निदर्शने झाली. बिकानेरमध्येही निदर्शकांनी खासदाराचा पुतळा जाळला. त्यांनी जयपूरमधील जिल्हा प्रशासन अधिकाऱ्याला उपराष्ट्रपतींना उद्देशून निवेदनही सादर केले, ज्यामध्ये राज्यसभा सदस्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. जयपूरमध्ये, विहिंप आणि बजरंग दलाने छोटी चौपाड येथे निदर्शने केली आणि खासदाराविरुद्ध घोषणाबाजी केली. बिकानेरमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली आणि खासदाराचा पुतळा जाळण्यात आला. सर्व हिंदू समाजाने पुकारलेल्या या निदर्शनात संघटनेच्या सदस्यांनी खासदार सुमन यांच्या वक्तव्याचा निषेध केला आणि राणा सांगा यांच्याबद्दलचे विधान निराधार आणि अपमानजनक असल्याचे म्हटले. सुमन यांचे राज्यसभा सदस्यत्व रद्द करावे आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करणारे निवेदन आंदोलकांनी जिल्हाधिकाऱ्यांना राष्ट्रपतींना दिले आहे.