नवी दिल्ली : मुंबईतील ‘26/11’सारखे हल्ले देशाच्या इतर शहरांतही घडवून आणण्यासाठी दहशतवादी तहव्वूर राणाने कट रचल्याचा संशय आहे, असा युक्तिवाद राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) शुक्रवारी न्यायालयात केला. दहशतवादी राणाला गुरुवारी भारतात आणल्यानंतर रात्री उशिरा दिल्लीतील पतियाळा न्यायालयात हजर करण्यात आले. एनआयएने राणाची 20 दिवस कोठडी मागितली. न्यायाधीश चंद्रजित सिंग यांनी राणाला 18 दिवसांसाठी एनआयएच्या कोठडीत पाठवण्याचा निर्णय मध्यरात्रीनंतर उशिरा दिला. आता एनआयए राणाची कसून चौकशी करणार आहे. त्याला मुंबईतही आणले जाणार आहे.
राष्ट्रीय तपास संस्थेने गुरुवारी सायंकाळी अधिकृतपणे राणाला अटक केली. त्याला अमेरिका येथून यशस्वीपणे प्रत्यार्पित करून भारतात आणण्यात आले होते. यानंतर दिल्लीतील एका विशेष न्यायालयाने त्याला 18 दिवसांच्या एनआयए कोठडीत पाठवले आहे.
न्यायाधीशांनी एनआयएला दर 24 तासांनी राणाची वैद्यकीय तपासणी करण्याचे आणि दर दुसर्या दिवशी त्याच्या वकिलाला भेटण्याची परवानगी देण्याचे निर्देश दिले. न्यायाधीशांनी राणाला फक्त सॉफ्ट टिप पेन वापरण्याची आणि एनआयए अधिकार्यांच्या उपस्थितीत त्याच्या वकिलाला ऐकू येईल अशा अंतरावर भेटण्याची परवानगी दिली.
युक्तिवादादरम्यान एनआयएने सांगितले की, कटाची संपूर्ण माहिती काढण्यासाठी राणाची दीर्घकाळ कोठडी आवश्यक आहे. 17 वर्षांपूर्वी घडलेल्या घटनांच्या तपासासाठी त्याला वेगवेगळ्या ठिकाणी नेण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे त्याला मुंबईत आणले जाणार आहे. मुंबई हल्ल्यासाठी रचण्यात आलेला कट इतर शहरांतही वापरण्यात येणार होता, असा संशय आहे. त्यामुळे राणाचा त्या दृष्टीने तपास केला जाईल. न्यायालयात एनआयएचे डीआयजी, आयजी आणि दिल्ली पोलिसांचे पाच डीसीपी उपस्थित होते.
न्यायालयाने तहव्वूर राणाला 18 दिवसांच्या एनआयए कोठडीत पाठवल्यानंतर त्याची चौकशी सुरू झाली आहे. एनआयएचे अधिकारी राणाची चौकशी करत आहेत. ही संपूर्ण चौकशी एनआयए चौकशी कक्षात सीसीटीव्हीसमोर होईल. याचे व्हिडीओ रेकॉर्डिंगही केले जाईल. राणाच्या कोठडीदरम्यान एनआयए दररोज चौकशी करेल.राणाच्या इमिग्रेशन कंपनीच्या आडून हेडलीने मुंबईमध्ये हल्ल्यापूर्वी रेकी करण्यासाठी भारतात प्रवेश केला. त्याला दहा वर्षांचा व्हिसा वाढवून मिळवून देण्यातही राणाची मदत होती, असे पोलिस अधिकार्याने सांगितले.
भारतामध्ये वास्तव्यात असताना हेडलीने इमिग्रेशन व्यवसायाच्या आडवाटा वापरल्या आणि तो राणाशी सातत्याने संपर्कात राहिला. या काळात राणा आणि हेडली यांच्यात 230 हून अधिक फोन कॉल झाले होते, असेही अधिकार्याने सांगितले.
एनआयएच्या आरोपपत्रानुसार, राणा याच कालावधीत 26/11 हल्ल्याचा आणखी एक सहआरोपी मेजर इक्बाल याच्याशीही संपर्कात होता. राणा स्वतः नोव्हेंबर 2008 मध्ये हल्ल्याच्या काही दिवस आधी भारतात आला होता.
26/11च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वूर हुसेन राणा याच्या प्रत्यार्पणाची प्रक्रियेनंतर गृह मंत्रालयाने अधिवक्ता नरेंद्र मान यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली आहे. गृहमंत्रालयाने जारी केलेल्या आदेशानुसार, अधिवक्ता नरेंद्र मान हे राष्ट्रीय तपास संस्थेच्या वतीने दिल्लीतल्या एनआयए विशेष न्यायालयांमध्ये व अपीली न्यायालयांमध्ये तहव्वूर राणा व डेव्हिड कोलमॅन हेडली विरुद्धच्या चौकशी व इतर बाबतीत पुढील तीन वर्षे किंवा खटल्याचा निकाल लागेपर्यंत (जे आधी होईल तो कालावधी) काम पाहतील.
गुप्तचर अधिकारी, एनआयए अधिकारी व गुन्हे शास्त्रज्ञ, मानसोपचार तज्ज्ञ यांचा समावेश असलेले एक पथक त्याची चौकशी करणार आहे. राणाचे पाकिस्तानी सरकार, आयएसआय नेटवर्क आणि लष्कर-ए-तोयबाच्या भारतातील कारवाया यांच्याशी असलेले संबंध यावर या चौकशीचा मुख्य फोकस असेल. 26/11 हल्ल्यातील त्याच्या भूमिकेवर प्रकाश टाकताना एनआयएने शुक्रवारी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे, भारताचा आरोप आहे की, राणाने आपल्या बालपणीच्या मित्र डेव्हिड कोलमन हेडली (ज्याचे मूळ नाव दाऊद गिलानी होते) याला मुंबईत मुक्तपणे प्रवास करता यावा आणि संभाव्य लक्ष्यांची पाहणी करता यावी यासाठी व्यवस्था उपलब्ध करून दिली.
निवेदनात असे म्हटले आहे की, इतर गोष्टींशिवाय हेडलीकडे कोणताही इमिग्रेशन अनुभव नसतानाही राणाने आपल्या इमिग्रेशन व्यवसायाची मुंबई शाखा उघडण्यास आणि हेडलीला त्या कार्यालयाचा व्यवस्थापक म्हणून नियुक्त करण्यास सहमती दिली. दोन वेगवेगळ्या प्रसंगी राणाने हेडलीला भारतीय अधिकार्यांकडे व्हिसा अर्ज सादर करण्यास मदत केली. त्यामध्ये राणाला माहिती असलेल्या खोट्या गोष्टी नमूद केल्या होत्या. दोन वर्षांहून अधिक काळ हेडलीने शिकागोमध्ये राणाची वारंवार भेट घेतली आणि लष्कर-ए-तोयबासाठी त्याने केलेल्या टेहळणी कारवायांची माहिती दिली आणि मुंबईवर संभाव्य हल्ल्यांचे बेत उघड केले. न्याय विभागाने राणाच्या प्रत्यार्पणाला या क्रूर हल्ल्यात मारल्या गेलेल्या सहा अमेरिकन नागरिकांसह इतर शेकडो बळींसाठी न्याय मिळवण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून संबोधले.
राणाचे वकीलपत्र घेणारे 37 वर्षीय पीयूष सचदेवा हे दिल्ली कायदा सेवा प्राधिकरणाचे सदस्य आहेत. त्यांनी पुण्याच्या आयएलएस लॉ कॉलेजमधून पदवी घेतली असून किंग्स कॉलेज, लंडन येथून आंतरराष्ट्रीय व्यवसाय व व्यावसायिक कायद्यांमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. सचदेवा यांच्यावर सोशल मीडियावर प्रचंड टीका होत आहे.
चौकशीशी संबंधित सूत्रांच्या मते, राणाकडून माहिती मिळवणे हे एक दीर्घकाळ चालणारे आणि कठीण काम असू शकते. कारण तो एक कट्टर प्रशिक्षित ऑपरेटिव्ह आहे आणि तो तपास चुकीच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न करू शकतो.
‘26/11’च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याच्या मुख्य आरोपींपैकी एक तहव्वूर हुसेन राणा याने सहआरोपी डेव्हिड कोलमॅन हेडलीला भारतीय व्हिसा मिळवून देण्यात मदत केली होती, अशी माहिती या प्रकरणाशी संबंधित एका वरिष्ठ पोलिस अधिकार्याने दिली आहे.
पाकिस्तानी मूळ असलेला कॅनेडियन व्यावसायिक आणि पूर्वी पाकिस्तान आर्मी मेडिकल कॉर्प्समध्ये काम केलेल्या तहव्वूर राणावर दहशतवाद्यांना महत्त्वपूर्ण मदत केल्याचा आरोप आहे. मुंबई हल्ल्यानंतर 11 महिन्यांनी, ऑक्टोबर 2009 मध्ये त्याला शिकागोमध्ये अटक करण्यात आली होती. 64 वर्षांचा राणा याच्यावर भारतात कट रचणे, खून, दहशतवादी कृत्य करणे आणि बनावट कागदपत्रे तयार करणे अशा गंभीर गुन्ह्यांचे आरोप आहेत. हे सर्व आरोप 2008 मधील लष्कर-ए-तोयबा (एलएटी) या बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनेच्या हल्ल्याशी संबंधित आहेत