नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा : दिल्लीतील कालकाजी विधानसभेचे भाजपचे उमेदवार रमेश बिधुडी यांचा पत्ता कट होण्याची दाट शक्यता आहे. आधी काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी आणि त्यानंतर दिल्लीच्या मुख्यमंत्री अतिशी यांच्याविरुद्ध त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केले. या पार्श्वभूमीवर भाजप त्यांच्याविरुद्ध कठोर भूमिका घेणार असल्याचे समजते.
फेब्रुवारी २०२५ मध्ये दिल्ली विधानसभेची निवडणूक होत आहे. केंद्र सरकारच्या माध्यमातून देशभर सत्तेत असलेला भाजप अडीच दशकांपासून दिल्लीत सत्तेत नाही. त्यामुळे यावेळी कुठल्याही परिस्थितीत दिल्ली जिंकायचीच, असा चंग भाजपने बांधला. यासाठीच्या राजकीय लढाईला सुरुवात होण्यापूर्वीच रमेश बिधुडींनी भाजपच्या रस्त्यात अडचण आणली. आधी ‘प्रियंका गांधींच्या गालासारखे रस्ते करू,’ अशी मुक्ताफळे त्यांनी उधळली. यावर काँग्रेसने बिधुडींविरूद्ध चांगलाच संताप व्यक्त केला. हा विषय पूर्ण होत नाही, तोच बिधुडींनी दिल्लीच्या मुख्यमंत्री अतिशी यांच्या वडिलांचा उल्लेख करत वादग्रस्त वक्तव्य केले. त्यामुळे एक होत नाही, तोच दुसऱ्या वादात बिधुडी अडकले. यानंतर आम आदमी पक्षाच्या नेत्यांसह पदाधिकाऱ्यांनी बिधुडींवर जोरदार टीका केली.
या दोन्ही घटनांनंतर बिधुडींनी माफी मागितली. मात्र, तोंडातून सुटलेले शब्द परत येत नाहीत. मुख्यमंत्री अतिशी यांना यावर प्रश्न विचारल्यानंतर त्यांना अश्रू अनावर झाले. काँग्रेस आणि आम आदमी पक्षांमध्ये दरी निर्माण करू पाहणाऱ्या भाजपाच्या रणनीतीला बिधुडींनी उधळलेल्या मुक्तफळांमुळे यश आले नाही. उलट बिधुडींसह भाजपवर काँग्रेस आणि आम आदमी पक्षाकडून चौफेर टीका होऊ लागली. या पार्श्वभूमीवर आता भाजप कठोर निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. कालकाजी विधानसभेतून बिधुडी यांच्या जागी उमेदवार बदलला जाण्याची दाट शक्यता आहे. निवडणुकीदरम्यान बिधुडींनी उधळलेल्या मुक्तफळांचा मुद्दा चर्चेत येऊ शकतो. आणि याचा फटका पक्षाला बसू शकतो, याचा विचार करून बिधुडींऐवजी दुसरा उमेदवार दिला जाण्याची शक्यता आहे.