नवी दिल्ली : बिहारमधील महाबोधी विहार (बोधगया) मंदिराचे व्यवस्थापन पूर्णपणे बौद्ध समुदायाकडे सोपवण्यात यावे आणि महाबोधी मंदिर कायदा रद्द करण्यात यावा, अशी मागणी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे केली. यासाठी शुक्रवारी रामदास आठवले यांनी संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. 'ऑपरेशन सिंदूर'च्या यशाबद्दलही आठवले यांनी पंतप्रधानांचे अभिनंदन केले.
रामदास आठवले यांनी बिहारमधील महाबोधी विहार (बोधगया) बाबतचा 'महाबोधी मंदिर कायदा' (१९४९) रद्द करण्याची मागणी पुन्हा एकदा मांडली. पंतप्रधानांशी झालेल्या संभाषणादरम्यान, आठवले यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी संबंधित स्थळांच्या विकासासाठी केंद्र सरकारने घेतलेल्या पुढाकारांचे कौतुक केले. पंतप्रधानांच्या कार्यकाळात, दिल्लीतील २६ अलीपूर रोड येथे डॉ. आंबेडकर राष्ट्रीय स्मारकाची स्थापना, डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्राचे (डीएआयसी) बांधकाम आणि डॉ. आंबेडकरांचे लंडनमधील ऐतिहासिक निवासस्थान महाराष्ट्र सरकारने केंद्राच्या मदतीने खरेदी केले. नरेंद्र मोदी सरकारने बाबासाहेबांशी संबंधित पाच प्रमुख स्थळांना 'पंचतीर्थ' म्हणून घोषित केले, असेही आठवले म्हणाले.