अयोध्येतील राम मंदिर आरडीएक्स बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. 
राष्ट्रीय

राम मंदिर आरडीएक्सने उडवून देण्याची धमकी

Ayodhya Ram Temple : समितीला ई-मेल; परिसरात कडेकोट पोलिस बंदोबस्त

पुढारी वृत्तसेवा

अयोध्या ः अयोध्येतील राम मंदिर आरडीएक्स बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. मंदिर देवस्थापन समितीला ई-मेलद्वारे धमकीचा मेसेज पाठविण्यात आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी चौकशी सुरू केली आहे.

या धमकीच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या असून, मंदिर परिसरातील सुरक्षा आणखी कडक करण्यात आली आहे. धमकीचा ई- मेल तामिळनाडूच्या पेरामलई येथील रहिवासी कृष्णा कोलाई याने 12 एप्रिल रोजी संध्याकाळी 5.30 वाजता पाठवला होता. या मेलमध्ये त्याने स्वतःला इसिसचा दहशतवादी असल्याचे सांगितले असून, राम मंदिरात आरडीएक्स स्फोट घडवण्याचा इशारा दिला आहे. विशेषतः, त्याने मंदिरात महिलांना आणि मुलांना येऊ न देण्याचा इशारा दिला आहे.

कृष्णा कोलाईने मेलमध्ये असा दावाही केला आहे की, एखादी तमिळ संघटनाही हा स्फोट घडवू शकते. त्याचा आरोप आहे की, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांच्या कार्यकाळात झालेल्या भ्रष्टाचारापासून जनतेचे लक्ष वळवण्यासाठी आणि तपासापासून वाचण्यासाठी ही योजना आखली जाऊ शकते, असा दावाही त्याने केला आहे. या धमकीची माहिती मिळताच ट्रस्टने ई-मेलची प्रत पोलिस आणि अन्य संबंधित अधिकार्‍यांना दिली आहे. अयोध्येच्या सायबर क्राईम पोलिस स्टेशनने ट्रस्टकडून ई-मेल प्राप्त झाल्यानंतर, आयटी अ‍ॅक्ट व भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता, ट्रस्ट किंवा पोलिस अधिकारी यावर अधिकृतरीत्या बोलण्याचे टाळत आहेत. मात्र, अयोध्या येथील श्रीरामजन्मभूमी मंदिर व परिसरात याआधीपासूनच अत्यंत कडेकोट सुरक्षा व्यवस्था आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT