पुढारी ऑनलाईन डेस्क : अयोध्या येथे सुरु असलेल्या राम मंदिराचे उर्वरित बांधकाम पूर्ण होण्यास नियोजित वेळेपेक्षा तीन महिने विलंब होईल. असे मंदिर बांधकाम समितीने स्पष्ट केले आहे. हिंदूच्या आस्थेचे प्रतिक असलेल्या या मंदिराचे बांधकाम २०२० मध्ये सुरु झाले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जानेवारी २०२४ मध्ये या मंदिराचे मोठ्या थाटात उद्घाटन केले. त्यावेळी मंदिराचा काही भाग पूर्ण झाला होता. पण संपूर्ण नियोजित मंदिर व परिसरातील इतर सर्व कामे पूर्ण होण्यास सप्टेंबर २०२५ ची वाट पहावी लागणार आहे. यापूर्वी हे काम जून २०२५ पर्यंत पूर्ण होईल असे सांगण्यात येत होते. असे वृत्त हिंदूस्थान टाईम्स ने दिले आहे.
मंदिर बांधकाम व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष न्रिपेंद्र मिश्रा यांनी सांगितले की सध्या आम्ही कुशल कारागिरांच्या टंचाईला सामोरे जात आहोत. सध्या मंदिर बांधणीतील कौशल्य असलेल्या कारागिरांचा तुटवडा जाणवत आहे. मंदिराच्या पहिल्या मजल्यासाठी वापरण्यात येणारे दगड घडवण्यासाठी आवश्यकतेपेक्षा २०० कारागीर कमी पडताहेत. परिणामी मंदिराचे बांधकाम संथ गतीने सुरु आहे. या मजल्यावर सुरु असलेल्या बांधकामात काही कमकुवत दगड आढळून आलेत. ते बदलण्यासाठीही वेळ जात आहे. तर संरक्षण भिंत बांधण्यासाठी जवळपास ८.५ लाख क्यूबिक फुट इतका ‘बन्सी पहारपूर’ दगड या मंदिराच्या आवारात आला आहे. पण तो घडवणे किचकट व वेळखाऊ आहे.
बांधकाम समितीने नुकताच मंदिर बांधकामाचा आढावा घेतला प्रेक्षागृह, दगडी भिंत, प्रदक्षिणा मार्ग यांची पाहणी यावेळी करण्यात आली. बांधकामाबरोबरच मंदिरात अजून काही मूर्ती स्थापन करण्यात येणार आहेत. यामध्ये श्रीराम व परिसरातील सहा मंदिरातील मूर्तींचा समावेश आहे. यातील दोन मूर्ती याअगोदरच प्रतिष्ठापित झाल्या आहेत. तर इतर मूर्तींचे काम जयपूर येथे सुरु आहे. डिसेंबर महिन्यात त्या येण्याची शक्यता आहे. असेही मिश्रा यांनी स्पष्ट केले.