नवी दिल्ली : जगविख्यात शिल्पकार राम सुतार यांनी आपल्या शिल्पांच्या माध्यमातून महाराष्ट्रासह देशाचा नावलौकिक जगभरात वाढविला आहे. त्यांनी घडविलेली शिल्पे इतिहासाची साक्षीदार असून, त्यातून अभिव्यक्त होणारा वारसा शेकडो वर्ष अबाधित राहील, अशा शब्दांत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी प्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांचा गौरव केला.
राम सुतार यांना शुक्रवारी राज्य सरकारचा सर्वोच्च नागरी सन्मान असणारा ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. भारतरत्न पुरस्कारासाठीही त्यांच्या नावाचा पाठपुरावा करू, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
राम सुतार यांच्या नोएडा (उत्तर प्रदेश) येथील निवासस्थानी झालेल्या या अनौपचारिक कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, खासदार महेश शर्मा, अनिल सुतार आदी उपस्थित होते. शिल्पकला क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल राम सुतार यांना हा पुरस्कार देण्यात आला असून, सन्मानचिन्ह, मानपत्र आणि 25 लाख रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
पुरस्कार प्रदान केल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, राम सुतार यांनी घडविलेली शिल्पे अतिशय परिपूर्ण असून, जगभरात ती दिमाखात उभी आहेत. त्यांच्या विविध कलाकृती त्यांच्यातील श्रेष्ठ कलाकाराची साक्ष देतात. राम सुतार यांच्या जीवनातील शिल्पांचे महत्त्व अलौकिक असून, त्यांच्या असामान्य सृजनशीलतेचा आविष्कार अनेक कलाकृतींमधून अनुभवायला मिळतो. सुतार यांच्या मनात महाराष्ट्र असून, पुरस्कार प्रदान करतेवेळी जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा असा जयघोष त्यांनी केला. राम सुतार यांच्यामुळे महाराष्ट्र भूषण पुरस्काराची उंची वाढली असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, राम सुतार यांनी केवळ देशातच नव्हे, तर जगभर शिल्पे उभारली आहेत. अनेक उंच पुतळे उभारणाऱ्या राम सुतार यांच्यामुळे पुरस्काराचीच उंची वाढली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, राम सुतार यांच्या श्रेष्ठ कलेची अनुभूती घेतली आहे. सुतार परिवाराच्या वतीने अनिल सुतार यांनी मनोगतात या सन्मानाबद्दल महाराष्ट्र सरकारचे आभार मानले.