Dr Ramvilas Das Vedanti passes away
अयोध्या : राम मंदिर आंदोलनात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे आणि दोनवेळा खासदार राहिलेले डॉ. रामविलास दास वेदांती यांचे आज (दि. १५) निधन झाले . मध्य प्रदेशातील रीवा येथे एका कथा महोत्सवावेळी अचानक त्यांची तब्येत बिघडली. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे त्यांची प्राणज्योत मालवली.
७७ वर्षीय वेदांती यांचे मंदिर आंदोलनात मोठे योगदान होते. ते ९० च्या दशकात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे गुरू अवैद्यनाथ स्वामी आणि परमहंस यांच्यासह मंदिर आंदोलनाच्या अग्रभागी असलेल्या नेत्यांपैकी एक होते. ते १९९६ आणि १९९८ मध्ये दोन वेळा खासदार म्हणून निवडून आले होते. दरम्यान, डॉ. वेदांती यांचे पार्थिव उशिरा सायंकाळपर्यंत अयोध्येला पोहोचेल. त्यांच्यावर मंगळवारी सकाळी १० वाजता अंत्यसंस्कार केले जाणार असून, त्यांची अंतिम यात्रा काढण्यात येईल. या अंतिम यात्रेत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह अनेक मान्यवर सहभागी होण्याची शक्यता आहे.
डॉ. वेदांती यांच्या निधनामुळे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. 'एक्स' (पूर्वीचे ट्विटर) पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, "श्री राम जन्मभूमी आंदोलनाचे प्रमुख आधारस्तंभ, माजी खासदार आणि श्री अयोध्या धाम येथील वसिष्ठ आश्रमाचे पूज्य संत डॉ. रामविलास वेदांती जी महाराज यांचे गोलोकगमन हे अध्यात्मिक जग आणि सनातन संस्कृतीसाठी न भरून येणारे नुकसान झाले आहे. त्यांना विनम्र श्रद्धांजली! त्यांचे जाणे एका युगाचा अस्त आहे. धर्म, समाज आणि राष्ट्राच्या सेवेसाठी समर्पित असलेले त्यांचे त्यागमय जीवन आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. प्रभू श्री रामचंद्रांकडे प्रार्थना आहे की, दिवंगत पुण्यात्म्यास आपल्या श्री चरणी स्थान द्यावे आणि त्यांच्या शोकग्रस्त शिष्य व अनुयायांना हे अथांग दुःख सहन करण्याची शक्ती प्रदान करावी."