minister raksha khadse 
राष्ट्रीय

महिला आरक्षण विधेयक देशाच्या भविष्याला दिशा देणारे ; मंत्री रक्षा खडसे 

हा केवळ विधेयकावरील वादविवाद नसून भारताच्या भविष्याचा निर्णायक क्षण असल्याचेही त्या म्हणाल्या

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली : महिला आरक्षण विधेयक हे केवळ कायदेबदल नसून देशाच्या भविष्याला दिशा देणारे ऐतिहासिक आणि परिवर्तनकारी पाऊल आहे, असे प्रतिपादन केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी संसदेत बोलताना केले. हा केवळ विधेयकावरील वादविवाद नसून भारताच्या भविष्याचा निर्णायक क्षण असल्याचेही त्या म्हणाल्या.

गुरुवारी संसदेत महिला आरक्षण विधेयकावर चर्चा करताना रक्षा खडसेंनी सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुले यांच्या कार्याचा उल्लेख करत महिला शिक्षणाच्या पायाभरणीची आठवण केली. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा संदर्भ देत महिलांच्या सन्मानाचे आणि अधिकारांचे महत्त्व अधोरेखित केले. त्या म्हणाल्या की, महिला सशक्त झाली तर संपूर्ण पिढी सशक्त होते. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ५० टक्के आरक्षणामुळे महिलांनी प्रभावी नेतृत्व सिद्ध केले. आता या विधेयकाद्वारे संसद आणि विधानसभांमध्ये महिलांचा सहभाग वाढवून धोरणनिर्मितीत त्यांचा आवाज अधिक प्रभावी करण्याचा प्रयत्न आहे, असेही त्या म्हणाल्या.

रक्षा खडसेंनी स्वतःचा ग्रामपंचायत सरपंच ते तीन वेळा लोकसभा सदस्य आणि मंत्री असा प्रवास सांगत महिलांमध्ये नेतृत्वाची प्रचंड क्षमता असल्याचे सांगितले. मंत्रालयांमध्ये महिलांचा सहभाग वाढल्याने प्रशासन अधिक सक्षम होत आहे. महत्त्वाच्या निर्णय प्रक्रियांमध्ये महिलांची भूमिका आहे. महिलांना केवळ लाभार्थी नव्हे, तर देशाच्या विकासाच्या सूत्रधार म्हणून स्थान देणे आवश्यक आहे. ‘विकसित भारत’ संकल्पनेत महिलांची भूमिका निर्णायक असून सर्व सदस्यांनी या ऐतिहासिक विधेयकाला पाठिंबा द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

२०१४ नंतर केंद्र सरकारने महिलांसाठी अनेक महत्त्वपूर्ण योजना राबवल्याचे सांगत त्यांनी ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ योजनेचा विशेष उल्लेख केला. मुलींच्या शिक्षणात लक्षणीय वाढ झाल्याचे सांगत माध्यमिक स्तरावर नावनोंदणी सुमारे ७८ टक्क्यांपर्यंत पोहोचल्याचे त्यांनी नमूद केले. प्रधानमंत्री उज्वला योजना, प्रधानमंत्री जनधन योजना, प्रधानमंत्री आवास योजना अशा विविध योजनांमधून मिळवलेल्या उपलब्ध देखील सभागृहात मांडल्या. महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी स्वयं-सहायता गटांशी सुमारे ११ कोटी महिलांना जोडण्यात आले असून मुद्रा योजनेद्वारे कर्जसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याचा उल्लेख त्यांनी केला. ‘लखपती दीदी’ उपक्रमाद्वारे महिलांना आत्मनिर्भर बनवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT