नवी दिल्ली : भाजप-महायुती राज्यातील राज्यसभेच्या सातव्या जागेवर देखील उमेदवार देण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीतील धूसपूस लक्षात घेता महायुती हे पाऊल उचलण्याची शक्यता आहे. भाजपकडून रामदास आठवले यांना पुन्हा राज्यसभेवर पाठवले जाणार असल्याचे जवळजवळ निश्चित झाले आहे. तर विनोद तावडे यांना राज्यसभा उमेदवारी दिली जाणार असल्याच्या चर्चा मुंबईपासून दिल्लीपर्यंत जोरदार सुरू आहेत.
विनोद तावडे हे भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचे निकटवर्तीय मानले जातात. बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांनी निरीक्षक म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली. त्यानंतर आता त्यांना केरळ विधानसभा निवडणुकीची महत्त्वपूर्ण जबाबदारी देण्यात आली आहे. या दरम्यान त्यांना राज्यसभा उमेदवारी देणार असल्याच्या चर्चा आहेत. तसेच पक्ष संघटनेत देखील मोठी जबाबदारी त्यांना दिले जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
दरम्यान, शुक्रवारी (२७ फेब्रुवारी रोजी ), भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी राज्यसभा निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या नेत्यांच्या नावांचा अहवाल त्यांच्याकडे सुपुर्द केला. यावेळी राज्यसभा उमेदवारांच्या नावावर चर्चा झाल्याचे समजते. तसेच महायुतीचा सातवा उमेदवार उतरवण्याच्या रणनीतीवर चर्चा झाल्याचे सुत्रांनी सांगितले. मात्र, महाविकास आघाडीकडून शरद पवार यांना उमेदवारी दिली जाणार असेल तर महायुती उमेदवार देणार नसल्याचे समजते. भाजप आणि महायुती पूर्ण ताकदीने निवडणुकीत उतरेल, असे त्यांनी या भेटीनंतर सांगितले होते.
राज्यसभेसाठी 'ही' नावे चर्चेत
राज्यातील राज्यसभेच्या जागांसाठी महायुतीमध्ये भाजपकडून रामदास आठवले, विनोद तावडे, रावसाहेब दानवे, विजया रहाटकर, धैर्यशील पाटील, प्रीतम मुंडे यांच्या नावांची चर्चा सुरू आहे. शिवसेना शिंदे गटाकडून राहुल शेवाळे, हेमंत गोडसे यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. दरम्यान, महायुतीकडून एक बडा ओबीसी चेहऱ्याला राज्यसभेत पाठवले जाणार असल्याचे समजते.