मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची वयाच्या ८५ व्या वर्षी तिसऱ्यांदा राज्यसभा खासदार म्हणून निवड झालीय. राज्यसभेतील सर्वात वयोवृद्ध खासदारांच्या यादीत शरद पवार दुसऱ्या स्थानी आहेत. ९२ वर्षांचे माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा हे सध्याचे राज्यसभेतील सर्वाधिक वयाचे खासदार आहेत.
एकीकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून ३५ वर्षांचे सर्वात तरुण खासदार म्हणून पार्थ पवार यांची निवड करण्यात आली. तर दुसरीकडे महाराष्ट्रातील सर्वाधिक वयाचे खासदार म्हणून ८५ व्या वर्षी महाविकास आघाडीने शरद पवारांना पाठिंबा दिला. मात्र प्रकृती बरी नसल्याने शरद पवार राज्यसभेचा अर्ज भरण्यासाठीही उपस्थित राहू शकले नाहीत. नातू आणि पवार आजोबा आता एकाचवेळी राज्यसभेत एकत्र बसणार आहेत.
सध्याच्या घडीला भारताचे माजी पंतप्रधान आणि जनता दल (धर्मनिरपेक्ष) पक्षाचे नेते एच. डी. देवेगौडा हे वयाच्या ९२ व्या वर्षी राज्यसभेतील सर्वात ज्येष्ठ विद्यमान खासदार आहेत. कर्नाटकमधून प्रतिनिधित्व करणाऱ्या देवेगौडांचा कार्यकाळ २०२६ मध्ये संपणार आहे. याआधी राम जेठमलानी यांनी वयाच्या ९२ व्या वर्षांपर्यंत बिहारचे प्रतिनिधित्व केले होते. २०१९ मध्ये त्यांचं निधन झाले. तर रिशांग केशिंग हे भारतातील सर्वात वयोवृद्ध संसदपटू ठरले होते. २०१४ मध्ये ते वयाच्या ९४ व्या वर्षी निवृत्त झाले.
८० पार नेत्यांची मांदियाळी
राज्यसभा हे भारतीय संसदेचे वरिष्ठ सभागृह... सध्या राज्यसभेत खरोखरच 'वरिष्ठ' आणि अनुभवी नेत्यांची मांदियाळी पाहायला मिळतेय. राज्यसभेत केवळ देवेगौडाच नव्हेत, तर ऐंशीचा टप्पा ओलांडलेले अनेक दिग्गज नेते सक्रिय आहेत. शरद पवार आणि एस. कल्याणसुंदरम हे दोन्ही ज्येष्ठ नेते वयाच्या ८५ व्या वर्षी सभागृहात कार्यरत आहेत. त्यापाठोपाठ ८३ वर्षांचे मल्लिकार्जुन खरगे आणि व्ही. विजयेंद्र प्रसाद हे ज्येष्ठता यादीत तिसऱ्या स्थानी आहेत. प्रसिद्ध संगीतकार इलायराजा वयाच्या ८२ व्या वर्षी खासदारकीची जबाबदारी सांभाळत आहेत.
टॉप १५ सिनिअर खासदार
देवेगौडा - 92 वर्ष
शरद पवार - 85 वर्ष
एस. कल्याणसुंदरम - 85 वर्ष
मल्लिकार्जुन खरगे - 83 वर्ष
व्ही. विजयेंद्र प्रसाद - 83 वर्ष
इलायाराजा - 82 वर्ष
चिदंबरम - 80 वर्ष
नरेन दास गुप्ता - 80 वर्ष
सोनिया गांधी - 79 वर्ष
दिग्विजय सिंह - 79 वर्ष
गोविंदभाई ढोलकिया - 78 वर्ष
जया बच्चन - 77 वर्ष
डॉ. धर्मस्थळ हेगडे - 77 वर्ष
राजेंद्र गेहलोत - 75 वर्ष
अब्दुल वहाब - 75 वर्ष