राष्ट्रीय

Rajnath Singh |  ‘रक्तदान करणारे योद्धे’, राजनाथ सिंहांकडून महाराष्ट्रातील रक्तदात्यांचे कौतुक!

छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राला वीरता, स्वाभिमान आणि करुणेचा वारसा : एकनाथ शिंदे 

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली : देशाच्या सीमेचे रक्षण करणाऱ्या जवानांसाठी रक्तदान करणाऱ्या महाराष्ट्रातील रक्तदाते योद्धे आहेत, असे प्रतिपादन संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी केले. तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राला वीरता, स्वाभिमान आणि करुणेचा वारसा लाभला आहे. याच परंपरेतून महाराष्ट्रातील रक्तदाते आणि पैलवान जवानांच्या पाठीशी उभे राहिले आहेत, असे शिंदे म्हणाले. क्रांतिदिनानिमित्त नवी दिल्ली येथे शिवसेनेच्या वतीने आयोजित 'सिंदूर महारक्तदान यात्रा' कार्यक्रमात दोन्ही नेते बोलत होते.

यावेळी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, राज्यातील मंत्री उदय सामंत शिवसेना संसदीय पक्षाचे नेते खा. डॉ. श्रीकांत शिंदे, खा. डॉ. ज्योती वाघमारे, व्हाइस अॅडमिरल आरती सरीन, लेफ्टनंट जनरल रणजीत सिंग, लेफ्टनंट जनरल नीरज सेठी, लेफ्टनंट जनरल अविनाश दास, डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांच्यासह लष्करी अधिकारी, शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने रक्तदाते उपस्थित होते.

'सिंदूर महारक्तदान यात्रा' कार्यक्रमात बोलताना राजनाथ सिंह म्हणाले की, एकनाथ शिंदे माझ्यापेक्षा लहान आहेत. मी त्यांना माझा लहान भाऊ मानतो. खासदार श्रीकांत शिंदे हे संसदेत आपले विचार प्रभावीपणे मांडत आहेत, असे म्हणत शिंदे पिता पुत्राचे त्यांनी कौतुक केले. सांगलीच्या खेळप्रेमी मातीतून आलेल्या पैलवानांनी या महारक्तदान शिबिराचे आयोजन केले. मागील वर्षी जम्मूमध्ये रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. यंदा दिल्लीतील लष्करी रुग्णालयात हा उपक्रम होत आहे. देशाच्या सुरक्षेसाठी सीमेवर तैनात असलेल्या जवानांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना रक्ताची गरज भासते. रक्ताला दुसरा पर्याय नसल्याने रक्तदानाचे महत्त्व अधिक आहे, असेही राजनाथ सिंह म्हणाले.

'कुंकू पुसणाऱ्या पाकिस्तानला गुडघ्यावर आणले'

यावेळी बोलताना एकनाथ शिंदे यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा संदर्भ देत पाकिस्तानवर जोरदार निशाणा साधला. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले आणि बहिणींच्या कपाळावरील कुंकू पुसणाऱ्या पाकिस्तानला गुडघ्यावर आणले, असा घणाघात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. आपल्या देशाच्या सुरक्षेसाठी भारत कोणत्याही पातळीवर जाऊ शकतो, हे जगाला दाखवून दिले आहे, असेही त्यांनी सांगितले. भारत कोणाला छेडत नाही मात्र भारताला कोणी छेडले तर भारत सोडतही नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

जवानांच्या रक्ताला महाराष्ट्राची रक्तदानातून साथ

सीमेवर बंदूक घेऊन अहोरात्र जागणाऱ्या जवानांमुळे १४० कोटी भारतीय शांततेत जीवन जगत आहेत. या जवानांच्या सन्मानासाठी रक्तदान करणाऱ्या महाराष्ट्रातील रक्तदात्यांनी वेगळा आदर्श निर्माण केला आहे, असेही शिंदे यांनी सांगितले. रक्ताला दुसरा पर्याय नाही. एका व्यक्तीचे रक्तच दुसऱ्या व्यक्तीला देता येते. त्यामुळे जवान आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी रक्तदान करण्यापेक्षा मोठी सेवा असू शकत नाही. रक्तदान ही आपली संस्कृती बनली पाहिजे,’ असे आवाहनही शिंदे यांनी केले.

उदय सामंत, श्रीकांत शिंदेंचे रक्तदान

‘सिंदूर महारक्तदान यात्रा’मध्ये महाराष्ट्रातील विविध भागांतून आलेले शिवसैनिक, कार्यकर्ते, पैलवान आणि रक्तदाते सहभागी झाले. मराठी भाषा आणि उद्योग मंत्री उदय सामंत, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनीही यावेळी रक्तदान केले. महाराष्ट्र डबल केसरी चंद्रहार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पैलवानांनी या उपक्रमात सहभाग घेतला. जवानांच्या सन्मानासाठी आखाड्यातील पराक्रमाबरोबरच रक्तदानाच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपल्याबद्दल शिंदे यांनी चंद्रहार पाटील यांचे विशेष अभिनंदन केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT