नवी दिल्ली : केरळ भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून माजी केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांची निवड करण्यात आली. एनडीएला राज्यात सत्तेत आणणार असल्याचे सांगत सोमवारी (दि.२४) त्यांनी पदभार स्वीकारला. सध्या केरळमध्ये माकपच्या नेतृत्वाखालील एलडीएफची सत्ता आहे आणि काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूडीएफ विरोधात आहे.
पक्ष कार्यकर्त्यांना संबोधित करताना चंद्रशेखर म्हणाले की, राज्यात भाजपच्या नेतृत्वाखालील आघाडीला विजयापर्यंत नेण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे आणि हे ध्येय साध्य करणारच, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला. केरळ दौऱ्यावर असलेले भाजपचे निरीक्षक आणि केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी एकमताने राजीव चंद्रशेखर यांची प्रदेशाध्यक्ष म्हणून निवड झाल्याचे जाहीर केले. यावेळी मावळते प्रदेशाध्यक्ष के. सुरेंद्रन आणि राज्य प्रभारी प्रकाश जावडेकर यांच्यासह राज्यातील सर्व प्रमुख भाजप नेते उपस्थित होते. दरम्यान, या निवडीनंतर राजीव चंद्रशेखर यांनी पक्षासह पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि सर्व वरिष्ठांचे आभार व्यक्त केले.
६० वर्षीय राजीव चंद्रशेखर हे २ दशकांपासून राजकारणात सक्रिय आहेत. यापुर्वी त्यांनी केंद्रात इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती व तंत्रज्ञान, कौशल्य विकास आणि उद्योजकता, जलशक्ती राज्यमंत्री म्हणून काम केले आहे. ते कर्नाटकातून ३ वेळा राज्यसभेचे खासदार देखील राहिले आहेत आणि भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते म्हणूनही त्यांनी काम केले आहे. चंद्रशेखर यांनी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत तिरुवनंतपुरम येथून एनडीए उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती मात्र काँग्रेस नेते शशी थरूर यांच्याकडून त्यांना पराभव पत्करावा लागला.