Rajasthan school roof collapse Rajasthan school roof collapse
राष्ट्रीय

Rajasthan school roof collapse : प्रार्थना सुरू असताना शाळेचं छत कोसळलं; ७ विद्यार्थ्यांचा मृत्यू

राजस्थानच्या झालावाड जिल्ह्यातील पिपलोडी गावातील प्राथमिक शाळेचे छत कोसळल्याने ३ ते ४ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

मोहन कारंडे

Rajasthan school roof collapse :

जयपूर: राजस्थानच्या झालावाड जिल्ह्यातील पिपलोदी गावात आज सकाळी शाळेचे छत कोसळले. प्रार्थना सुरू असतानाच प्राथमिक शाळेच्या इमारतीचे छत अचानक कोसळले, ज्यामुळे शाळा परिसरात एकच गोंधळ उडाला. यात सात मुलांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या दुर्घटनेनंतर शिक्षणमंत्री मदन दिलावर यांनी घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत.

ढिगाऱ्याखाली अडकलेले सर्व विद्यार्थी इयत्ता सातवीचे असल्याचे समोर आले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी, तसेच बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी ढिगाऱ्याखाली अडकलेल्या मुलांना बाहेर काढण्याचे काम सुरू केले. स्थानिक नागरिकही मदतीसाठी पुढे सरसावले. सर्वांनी एकत्र येऊन ढिगारा हटवला आणि मुलांना बाहेर काढले.

ही दुर्घटना झालावाड जिल्ह्यातील मनोहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शाळेचे छत बऱ्याच काळापासून जीर्ण झाले होते आणि सततच्या मुसळधार पावसामुळे ते कधीही कोसळण्याची भीती व्यक्त केली जात होती. तरीही याकडे दुर्लक्ष करण्यात आले, ज्याचा परिणाम म्हणून निष्पाप मुलांना आपला जीव गमवावा लागला.

गंभीर जखमी झालेल्या मुलांना झालावाड जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बचाव पथकासोबत गावकरीही ढिगारा हटवण्याच्या कामात पूर्णपणे गुंतले होते.

मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश

मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त करत मृत्यू झालेल्या मुलांच्या आत्म्यांना शांती मिळो, अशी प्रार्थना केली. तसेच, त्यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे निर्देशही दिले आहेत.

पंतप्रधान मोदींनी व्यक्त केले दुःख, मदतीचे दिले आश्वासन

झालावाड शाळा दुर्घटनेत मुलांच्या मृत्यूबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. ट्विटद्वारे मोदी म्हणाले, "ही दुर्घटना अत्यंत दुःखद आहे. या कठीण काळात माझ्या संवेदना पीडित विद्यार्थी आणि त्यांच्या कुटुंबीयांसोबत आहेत. जखमी विद्यार्थी लवकरात लवकर बरे व्हावेत, अशी मी प्रार्थना करतो." यासोबतच पंतप्रधानांनी सर्वतोपरी मदतीचे आश्वासनही दिले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT