Raja Raghuvanshi murder case | मेघालयात हनिमूनसाठी गेलेल्या इंदूरमधील नवविवाहित राजा रघुवंशी हत्या प्रकरणी त्याची सोनम रघुवंशीला ( Sonam Raghuvanshi) पोलिसांनी मंगळवारी अटक केली. या प्रकरणी अनेक धक्कादायक खुलासे होत आहेत. आता राजा रघुवंशी यांच्या आईने सोनमच्या कुटुंबावर काळ्या जादूचा आरोप केला आहे.
राजा रघुवंशी आणि त्यांची पत्नी सोनम २२ मे रोजी हनिमूनसाठी शिलाँगला गेले होते. २३ मे रोजी संध्याकाळपासून ते चेरापुंजी जवळील ओसारा हिल्स येथून बेपत्ता झाले होते. त्यानंतर त्यांचा कुटुंबाशी संपर्क झाला नाही.राजा रघुवंशी यांचा मृतदेह २ जून रोजी शिलाँगमधील एका पर्यटनस्थळी २०० फूट खोल दरीत झाडावर लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. यानंतर राजा यांच्या कुटुंबाने कधीही सोनमवर शंका व्यक्त केली नाही. त्यांना फक्त एवढेच हवे होते की जरी त्यांनी त्यांचा मुलगा गमावला असला तरी त्यांची सून सुखरूप परत यावी; परंतु जेव्हा शिलाँग पोलिसांनी या हत्येचा पर्दाफाश केला तेव्हा त्यांच्या पायाखालच जमीनच सरकली.
राजा रघुवंशी यांच्या आईने म्हटले आहे की, सोनमचे संपूर्ण कुटुंब काळ्या जादूवर विश्वास ठेवते. म्हणूनच सोनमच्या वडिलांनी त्यांच्या मुलीचा फोटो दारावर उलटा लटकवला होता. सोनमने माझ्या मुलाचा बळी दिला, म्हणून ती प्रथम कामाख्या देवीला गेली. राजाचा भाऊ विपिननेही काळ्या जादूचा संशय व्यक्त केला. तो म्हणाला की, जेव्हा राजा बेपत्ता झाला तेव्हा सोनमच्या वडिलानी त्याचा फोटो उलटा लटकवला नाही. मात्र तो सर्व काही त्याच्या मुलीसाठी करत हाेता. राजा-सोनमच्या लग्नात विधी करणारा पंडित गायब झाला आहे. त्यानेच सोनमच्या कुटुंबाला फोटो उलटा लटकवण्याचा सल्ला दिला होता, असा आराेपही राा रघुवंशीच्या आईने केला आहे.
राजा रघुवंशी यांचे बंधू विपिन म्हणाले की, मी आणि माझे कुटुंब मेघालयातील लोकांची आणि सरकारची माफी मागतो. राजा आणि सोनम बेपत्ता झाल्यावर आम्ही सरकार आणि पोलिसांवर केलेल्या आरोपांकडे आता दुर्लक्ष केले पाहिजे. विपिन असेही म्हणाले की, मेघालय सरकारने राजाच्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षा द्यावी, अशी आमची मागणी आहे.