Punjab Railway Blast | पंजाबमध्ये प्रजासत्ताक दिनापूर्वी रेल्वे रुळावर स्फोट Pudhari file Photo
राष्ट्रीय

Punjab Railway Blast | पंजाबमध्ये प्रजासत्ताक दिनापूर्वी रेल्वे रुळावर स्फोट

मालगाडी रुळावरून घसरली; लोको पायलट जखमी

पुढारी वृत्तसेवा

फतेहगड साहिब (पंजाब); वृत्तसंस्था : प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात हाय अलर्ट असतानाच पंजाबमधील फतेहगड साहिब जिल्ह्यातील सरहिंदजवळ एका मालवाहतूक रेल्वे रुळावर शुक्रवारी रात्री भीषण स्फोट झाला. या स्फोटामुळे रुळाचे मोठे नुकसान झाले असून, त्यावरून जाणारी एक मालगाडी रुळावरून घसरली. या अपघातात मालगाडीचा लोको पायलट जखमी झाला असून त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सरहिंद रेल्वे स्थानकापासून सुमारे 4-5 किलोमीटर अंतरावर असलेल्या खानपूर गावाजवळ रेल्वे पोल क्रमांक 1208जवळ हा स्फोट झाला. शुक्रवारी रात्री 9.50च्या सुमारास झालेल्या या स्फोटामुळे रेल्वे मार्गाचा सुमारे 600 मीटरचा पट्टा बाधित झाला आहे. हा मार्ग प्रामुख्याने मालवाहतूक गाड्यांसाठी वापरला जातो. स्फोटानंतर मालगाडीचे इंजिन रुळावरून खाली उतरले. यामुळे रेल्वे प्रशासनाची मोठी धावपळ उडाली.

पोलिस आणि रेल्वे प्रशासनाची कारवाई

घटनेची माहिती मिळताच रोपड रेंजचे डीआयजी नानक सिंह आणि रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. स्फोटाची माहिती मिळताच फॉरेन्सिक आणि तांत्रिक पथके घटनास्थळी पाठवण्यात आली आहेत. पुरावे गोळा करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे, असे डीआयजी नानक सिंह यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. रेल्वे प्रशासनाने तातडीने दुरुस्ती कार्य हाती घेऊन विस्कळीत झालेली वाहतूक पूर्ववत केली आहे.

दहशतवादी हल्ला की गुन्हेगारी कट?

सध्या या प्रकरणाची नोंद रेल्वे कायद्याच्या कलम 150 (रेल्वेचे जाणीवपूर्वक नुकसान करणे) अन्वये अज्ञात व्यक्तींविरुद्ध करण्यात आली आहे. हा दहशतवादी हल्ला आहे का, असे विचारले असता डीआयजी सिंह म्हणाले की, तपासापूर्वी याला दहशतवादी हल्ला म्हणणे घाईचे ठरेल. सध्या आम्ही याकडे एक गंभीर गुन्हेगारी कृत्य म्हणून पाहत आहोत. सखोल तपासानंतरच नेमके कारण स्पष्ट होईल.

1) स्फोटाची वेळ : हा स्फोट शुक्रवारी रात्री साधारण 9.50 वाजता सरहिंद जवळील खानपूर येथे झाला.

2) नुकसान : स्फोटामुळे सुमारे 600 मीटरचा रेल्वे मार्ग बाधित झाला असून मालगाडीचे इंजिन रुळावरून घसरले.

3) तपास पथके : फॉरेन्सिक आणि तांत्रिक पथकांकडून घटनास्थळावरून पुरावे संकलित करण्याचे काम सुरू आहे.

4) सुरक्षा वाढवली : प्रजासत्ताक दिनापूर्वी झालेल्या या घटनेमुळे परिसरात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT