Railway Employees Diwali Bonus 2026 Pudhari
राष्ट्रीय

Railway Employees Bonus: रेल्वेच्या ११ लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांसाठी दिवाळीआधी मोठं गिफ्ट! बोनसला मंजुरी, किती पैसे मिळणार?

Railway Employees Diwali Bonus 2026: केंद्र सरकारने भारतीय रेल्वेच्या ११ लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांसाठी उत्पादकतेशी जोडलेल्या बोनसला मंजुरी दिल्याची माहिती देण्यात आली आहे.

Rahul Shelke

Railway Employees Diwali Bonus 2026: भारतीय रेल्वेमध्ये काम करणाऱ्या लाखो कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. केंद्रातील मोदी सरकारने रेल्वे कर्मचाऱ्यांना उत्पादकतेशी जोडलेला बोनस (Productivity Linked Bonus – PLB) देण्यास मंजुरी दिली आहे. या निर्णयाचा फायदा रेल्वेच्या ११ लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना होणार आहे. सणासुदीच्या काळात कर्मचाऱ्यांना आर्थिक दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारकडून दरवर्षी या बोनसची घोषणा केली जाते.

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली. त्यामुळे रेल्वे कर्मचाऱ्यांना सणासुदीच्या काळात अतिरिक्त पैसे मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

रेल्वे कर्मचाऱ्यांना दिला जाणारा हा बोनस त्यांच्या कामगिरीशी आणि रेल्वेच्या उत्पादकतेशी संबंधित असतो. सणांच्या काळात घरखर्च, खरेदी आणि इतर गरजा पूर्ण करण्यासाठी या बोनसची मदत होते. त्यामुळे सरकारच्या या निर्णयामुळे रेल्वे कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे.

वैष्णव यांनी सांगितले की, सरकार कर्मचाऱ्यांना बोनस म्हणून एकूण २,००९ कोटी रुपये देणार आहे. केंद्रीय मंत्र्यांनी सांगितले की, रेल्वेमध्ये १ लाख ६५ हजार पदांवर भरती प्रक्रिया सुरू आहे. २०१४ पासून आतापर्यंत रेल्वेमध्ये ५ लाख नोकऱ्या देण्यात आल्या आहेत.

केंद्रीय मंत्रिमंडळाने बँकिंग क्षेत्रातही एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आयडीबीआय (IDBI) बँकेच्या धोरणात्मक पुनर्रचनेच्या प्रक्रियेअंतर्गत स्ट्रॅटेजिक पार्टनरची निवड करण्यात आली आहे. देशाच्या बँकिंग इतिहासातील हा सर्वात मोठ्या थेट परकीय गुंतवणुकीच्या (FDI) व्यवहारांपैकी एक ठरण्याची शक्यता आहे. या पुनर्रचना आणि धोरणात्मक निर्गुंतवणुकीनंतरही केंद्र सरकार आणि भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) मिळून बँकेतील आपला ३४ टक्के हिस्सा कायम ठेवणार आहेत.

रेल्वे कर्मचाऱ्यांना दरवर्षी मिळतो बोनस

रेल्वे कर्मचाऱ्यांना उत्पादकतेवर आधारित हा बोनस दरवर्षी दुर्गापूजा आणि दसऱ्याच्या सुट्ट्यांपूर्वी दिला जातो. यंदाही कर्मचाऱ्यांना सुमारे ७८ दिवसांच्या वेतनाइतका बोनस देण्यात आला आहे. प्रत्येक पात्र कर्मचाऱ्याच्या खात्यात बोनस म्हणून जास्तीत जास्त १७,९५१ रुपये जमा होणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT