ज्‍येष्‍ठ नेते शशि थरुर यांच्‍या नाराजीनाम्‍याची चर्चा केरळ काँग्रेसमध्‍ये असतानाच राहुल गांधी यांनी इंस्टाग्रामवर एक सूचक पोस्‍ट शेअर केली आहे.  (Image source- X)
राष्ट्रीय

शशी थरुरांच्‍या 'नाराजीनामा'नंतर राहुल गांधींची सूचक पोस्‍ट, "ते एकजूट..."

केरळ काँग्रेसमधील अंतर्गत कलहावर पडदा पडल्‍याचा दावा

पुढारी वृत्तसेवा

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : "पक्षाला माझी गरज असेल तर मी पक्षात राहीन. अन्‍यथा माझ्याकडे इतर पर्याय आहेत. तुम्ही असे समजू नका की, माझ्याकडे दुसरा कोणताही मार्ग नाही," असे विधान करत ज्‍येष्‍ठ नेते शशि थरुर यांनी केरळ काँग्रेसमध्‍ये खळबळ माजवली होती. त्‍यांच्‍या नाराजीनाम्‍याची चर्चा केरळ काँग्रेसमध्‍ये असतानाच काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सोशल मिडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर एक सूचक पोस्‍ट शेअर केली आहे.

केरळ काँग्रेसमधील अंतर्गत कलह आले होते चव्‍हाट्यावर

नुकतेच थरूर यांनी एका लेखात केरळमधील डाव्‍या सरकारच्‍या कामाचे कौतुक केले होते. त्‍यांनी आपल्‍या लेखाचे समर्थन करत म्हटले होते की, "माझे मत कोणत्याही डाव्या विचारसरणीच्या कागदपत्रांवर आधारित नाही. ते ग्लोबल स्टार्टअप अहवाल आणि केंद्र सरकारच्या व्यवसाय सुलभता अहवालावर आधारित आहे." यानंतर काँग्रेसमधून थरुर यांच्‍यावर टीका सुरु झाली. केरळ काँग्रेसचे प्रमुख के. सुधाकरन म्हणाले की, थरूर यांचे विधान पक्षाला बळकटी देण्यासाठी असावे. तर थरूर यांचे विधान तथ्यांवर आधारित आहे. ते केरळबद्दल आहे, कोणत्याही राजकीय पक्षाबद्दल किंवा सरकारबद्दल नाही. सर्व केरळवासीयांना मोठ्या अडचणींमध्ये आमच्या विकासाचा अभिमान वाटला पाहिजे. त्यांच्या शब्दांना कोणताही राजकीय रंग देण्याची गरज नाही," असे आवाहन केरळचे मुख्यमंत्री पिनारायी विजयन यांनी केले होते. काँग्रेस नेत्‍यांकडून झालेल्‍या टीकेला प्रत्‍युत्तर देताना थरुय यांनी "पक्षाला माझी गरज असेल तर मी पक्षात राहीन. अन्‍यथा माझ्याकडे इतर पर्याय आहेत. तुम्ही असे समजू नका की, माझ्याकडे दुसरा कोणताही मार्ग नाही," असे विधान करत खळबळ माजवली होती.

दिल्‍लीतील बैठक थरुर झाले सहभागी

केरळ काँग्रेसमधील अंतर्गत मतभेदावर चर्चा सुर असतानाच शुक्रवार, २८ फेब्रुवारी रोजी दिल्‍लीत पक्षश्रेष्‍ठींबरोबर झालेल्‍या बैठकीतही शशी थरुर सहभागी झाले होते. या बैठकीला पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि वरिष्ठ नेते राहुल गांधी, प्रियंका गांधी वाड्रा आणि केसी वेणुगोपाल उपस्थित होते. सुधाकरन, केरळ विधानसभेतील काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते व्ही. डी. सतीसन, थरूर आणि केरळच्या एआयसीसी प्रभारी दीपा दासमुन्शी देखील उपस्थित होते. बैठकीनंतर X वर लिहिलेल्या पोस्टमध्ये थरूर यांनी बैठकीत झालेल्‍या चर्चेबाबत समाधान व्‍यक्‍त केले होते. तर या बैठकीनंतर दासमुन्शी म्हणाल्या होत्‍या की, "आम्हाला पक्षश्रेष्‍ठींकडून स्पष्ट संकेत मिळाला आहे की, काँग्रेस केरळच्या लोकांशी भावनिकदृष्ट्या जोडलेला पक्ष आहे. आपण केरळच्या लोकांचा अनादर होईल, असे कोणतेही विधान करु नये. जर कोणी वैयक्तिकरित्या काही बोलले तर कठोर कारवाई करू. केरळमध्ये काँग्रेसमधील एकजूट कायम आहे. ते एकमताने निर्णय घेतील आणि बोलतील."

राहुल गांधी यांची सूचक पोस्‍ट

काँग्रेससह केरळमधील राजकीय वर्तुळात शशी थरुर यांच्‍या नाराजीची चर्चा सूरु होती. मात्र पुढील वर्षी होणार्‍या विधानसभा निवडणुकीत याचा फटका बसू नये म्‍हणून राहुल गांधी यांनी पुढाकार घेतला आहे. त्‍यांनी दक्षिणेकडील राज्यातील काँग्रेस नेत्यांचा फोटो पोस्ट केला आहे. तसेच " ते एकजूट आहेत" आणि "पुढील उद्देशाच्या प्रकाशाने एकत्र आले आहेत" अशी कॅप्‍शनही लिहिली आहे. या फोटोत तिरुवनंतपुरमचे खासदार शशी थरूर यांचा समावेश आहे. राहुल गांधी यांच्‍या पोस्‍टमुळे केरळ काँग्रेसमधील अंतर्गत मतभेदावर पडदा पडल्‍याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT