Rahul Gandhi Girlfriend Pudhari
राष्ट्रीय

Rahul Gandhi Girlfriend: 'ती' सध्या काय करते? गर्लफ्रेंडबद्दल विचारताच राहुल गांधींनी दिलं मिश्किल उत्तर; म्हणाले, 'ती माझी...'

Rahul Gandhi Girlfriend: सोनिया गांधी यांच्या आत्मचरित्राच्या प्रकाशन सोहळ्यात राहुल गांधी यांनी केंब्रिजमधील आपल्या जुन्या गर्लफ्रेंडसोबतचा एक खास किस्सा सांगितला.

पुढारी वृत्तसेवा

Rahul Gandhi Girlfriend: काँग्रेसचे खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी नुकत्याच एका कार्यक्रमात आपल्या खासगी आयुष्याबद्दल एक किस्सा सांगितला. आई सोनिया गांधी यांच्या 'Belonging: A Journey of Love' या आत्मचरित्राच्या प्रकाशन सोहळ्यात त्यांनी आपल्या गर्लफ्रेंडचा उल्लेख केला. यावेळी उपस्थितांनी त्यांच्या गर्लफ्रेंडबद्दल विचारले असता राहुल गांधी यांनी मिश्किलपणे, 'आता ती माझी मैत्रीण आहे,' असे उत्तर दिले. त्यांच्या या उत्तराची सध्या चर्चा होत आहे.

केंब्रिजमधील त्या रेस्टॉरंटला गर्लफ्रेंडसोबत दिली भेट

राहुल गांधी यांनी केंब्रिज विद्यापीठात शिक्षण घेत असतानाचा एक जुना प्रसंग सांगितला. त्यांच्या आई-वडिलांची म्हणजेच राजीव गांधी आणि सोनिया गांधी यांची पहिली भेट केंब्रिजमधील 'व्हर्सिटी रेस्टॉरंट'मध्ये झाली होती. त्यामुळे हे ठिकाण पाहण्याची राहुल गांधी यांची इच्छा होती.

अनेक वर्षांनंतर राहुल गांधी पुन्हा केंब्रिजमध्ये गेले असताना त्यांनी आपल्या गर्लफ्रेंडला या रेस्टॉरंटमध्ये जाण्याची इच्छा बोलून दाखवली. त्यानंतर दोघेही त्या रेस्टॉरंटमध्ये गेले.

तेथील कर्मचाऱ्याला राहुल गांधी यांनी आपले आई-वडील याच रेस्टॉरंटमध्ये पहिल्यांदा भेटल्याचे सांगितले. त्यावर कर्मचाऱ्याने लगेचच त्यांना ओळखले. 'अरे, ते दोघे! मला ते चांगलेच आठवतात,' असे उत्तर त्या कर्मचाऱ्याने दिले.

हा प्रसंग सांगताना राहुल गांधी म्हणाले की, त्यांच्या आई-वडिलांच्या भेटीबद्दल अनेक किस्से सांगितले जायचे. त्यापैकी हा एक प्रसिद्ध किस्सा होता. त्यामुळे आपल्यालाही ते ठिकाण पाहायचे होते.

'आता ती माझी मैत्रीण आहे'; राहुल गांधींचं उत्तर चर्चेत

कार्यक्रमात राहुल गांधी यांनी गर्लफ्रेंडचा उल्लेख केल्यानंतर उपस्थितांनी त्यांना तिच्याबद्दल प्रश्न विचारला. त्यावर राहुल गांधी यांनी हसत उत्तर दिले, 'She is a friend of mine' म्हणजेच 'आता ती माझी मैत्रीण आहे.'

त्यांच्या या छोट्याशा उत्तराने कार्यक्रमात उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. राहुल गांधी यांनी यावेळी आपल्या वैयक्तिक आयुष्यातील एक दुर्मिळ आठवणही सर्वांसोबत शेअर केली.

सोनिया गांधींनी चार वेळा कर्करोगावर मात केल्याचा खुलासा

याच कार्यक्रमात राहुल गांधी यांनी आई सोनिया गांधी यांच्या आरोग्याबद्दलही एक महत्त्वाचा खुलासा केला. सोनिया गांधी यांनी आपल्या आत्मचरित्रात त्यांच्या आजारपणाबद्दल फारसा उल्लेख केलेला नाही. मात्र, त्यांनी आयुष्यात चार वेळा कर्करोगावर मात केली आहे, असे राहुल गांधी यांनी सांगितले.

'आईने पुस्तकात स्वतःला दोन किंवा तीन वेळा कर्करोगातून सावरल्याचा उल्लेख केला आहे. पण प्रत्यक्षात ती चार वेळा कर्करोगावर मात करून बाहेर आली आहे. ती या सगळ्या गोष्टी जास्त सांगत नाही. मी आयुष्यात एकदाही तिला घाबरलेलं पाहिलं नाही. कोणत्याही परिस्थितीत तिने माघार घेतलेली मी पाहिलेलं नाही,' अशा शब्दांत राहुल गांधी यांनी आईच्या धैर्याचे कौतुक केलं.

राजीव गांधींच्या हत्येनंतर...

कार्यक्रमात सोनिया गांधी यांनीही राजीव गांधी यांच्या हत्येनंतरच्या कठीण काळातील आठवणी सांगितल्या. 1991 मध्ये राजीव गांधींची हत्या झाल्यानंतर राहुल गांधी यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला होता.

काही महिन्यांनंतर राहुल गांधी यांना परदेशात शिक्षणासाठी जायचे होते. त्यावेळी ते हार्वर्ड विद्यापीठात शिकत होते. मात्र, त्यांच्या सुरक्षेसाठी स्वतंत्र व्यवस्था केल्यास इतर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेलाही धोका निर्माण होऊ शकतो, अशी परिस्थिती होती.

त्यामुळे सुरक्षा यंत्रणांनी राहुल गांधी यांना अमेरिकेतील दुसऱ्या महाविद्यालयात पाठवण्याची व्यवस्था केली. विशेष म्हणजे, तेथे त्यांना वेगळ्या नावाने प्रवेश देण्यात आला होता. त्यांच्या खऱ्या ओळखीबद्दल इतर विद्यार्थ्यांना माहिती नसावी, अशी खबरदारी घेण्यात आली होती.

या काळात राहुल गांधी यांच्यासाठी मित्रांशी मोकळेपणाने बोलणेही कठीण झाले होते. स्वतःच्या कुटुंबाबद्दलही त्यांना कोणाशी सहजपणे बोलता येत नव्हते, असे सोनिया गांधी यांनी सांगितले.

या कार्यक्रमाला राहुल गांधी यांची बहीण प्रियंका गांधी वाड्रा यांचीही उपस्थिती होती. सोनिया गांधी यांच्या आत्मचरित्राच्या प्रकाशनाच्या निमित्ताने गांधी कुटुंबातील अनेक वैयक्तिक आठवणी पहिल्यांदाच सार्वजनिकपणे समोर आल्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT