राष्ट्रीय

पंतप्रधान मोदींसह राहुल गांधी, योगी, केजरीवालांचे मतदारांना आवाहन

Shambhuraj Pachindre

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : देशाची लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी आणि त्यातील सहभाग वाढविण्यासाठी मोठ्या संख्येने मतदान करा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी (दि.1) सोशल मीडियावरील "एक्स" च्या पोस्टमधून केले. मोदी यांच्याशिवाय उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, काँग्रेस नेते राहुल गांधी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह इतर राजकीय पक्षांच्या मोठ्या नेत्यांनी लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान करण्याचे आवाहन केले.

कन्याकुमारी येथील "विवेकानंद मेमोरियल रॉक " या स्वामी विवेकानंद यांच्या स्मृतीस्थळावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ४५ तासांची ध्यानधारणा पूर्ण केली. त्यानंतर वाराणसी या आपल्या मतदारसंघात मतदानाला सुरुवात होण्यापूर्वीच मोदी यांनी सोशल मीडियावरील एक्सवर पोस्ट केली. लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी आणि त्यातील आपला सहभाग वाढविण्यासाठी मोठ्या संख्येने घराबाहेर पडून मतदान करा असे आवाहन मोदी यांनी या पोस्टमधून केले आहे.

योगी आदित्यनाथ यांचे मतदारांना आवाहन

उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शनिवारी सकाळी गोरखपूर लोकसभा मतदारसंघात आपला मतदानाचा हक्क बजावला. आत्मनिर्भर आणि विकसित भारतासाठी मतदान करा, असे आवाहन मुख्यमंत्री योगी यांनी केले.

एक्सवर पोस्ट करत राहुल गांधींचे मतदारांना आवाहन

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देखील एक्सवर मतदारांना आवाहन करणारी पोस्ट केली. भाजपच्या अभिमानी व अत्याचारी सरकारला अखेरचा धक्का देण्यासाठी मोठ्या संख्येने मतदान करा, असे आवाहन राहुल गांधी यांनी या पोस्टमधून केले.

केजरीवालांचे आवाहन

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही एक्सवर पोस्ट केली. हुकूमशाहीचा अंत करण्यासाठी तसेच लोकशाही व संविधान वाचविण्यासाठी मतदान करण्याचे आवाहन केजरीवाल यांनी जनतेला केले.

स्टॅलिन, तेजस्वी यादवांचीही पोस्ट

तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनीही फॅसिस्ट सरकारचा पराभव करण्यासाठी मतदान करा, असे आवाहन एक्सवर केले. राष्ट्रीय जनता दलाचे नेते व बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनीही एक्सवर पोस्ट करून मतदान करण्याचे आवाहन मतदारांना केले.

SCROLL FOR NEXT