Rahul Gandhi on PM Modi
नवी दिल्ली : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले. वंचित समाजातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळण्यास होणाऱ्या विलंबाकडे आणि वसतिगृहाच्या समस्यांकडे त्यांनी लक्ष वेधले आहे. देशातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, आर्थिक दृष्ट्या मागासवर्गीय, इतर मागासवर्गीय आणि अल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्या हिताचे निर्णय घेण्याचे आवाहन केले.
पंतप्रधानांना लिहीलेल्या पत्रात राहुल गांधी म्हणाले की, विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाच्या संधींमध्ये अडथळा निर्माण करणाऱ्या दोन गंभीर समस्या सोडवल्या जाव्यात. पहिली समस्या म्हणजे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, आर्थिक दृष्ट्या मागासवर्गीय, इतर मागासवर्गीय आणि अल्पसंख्याक समुदायातील विद्यार्थ्यांसाठी असलेल्या निवासी वसतिगृहांमधील परिस्थिती दयनीय आहे. बिहारमधील दरभंगा येथील आंबेडकर वसतिगृहाला अलिकडेच भेट दिली. ६-७ विद्यार्थ्यांना एका खोलीत राहायला भाग पाडले जाते, अस्वच्छ शौचालये, असुरक्षित पिण्याचे पाणी, जेवणाच्या सुविधांचा अभाव आणि ग्रंथालये किंवा इंटरनेटची उपलब्धता नसल्याची तक्रार विद्यार्थांनी केली.
दुसरे म्हणजे वंचित समाजातील विद्यार्थ्यांसाठी मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती मिळण्यास मोठा विलंब होत आहे. बिहारमध्ये शिष्यवृत्ती पोर्टल तीन वर्षांपासून कार्यरत नव्हते, २०२१-२२ मध्ये कोणत्याही विद्यार्थ्याला शिष्यवृत्ती मिळाली नाही. त्यानंतरही, शिष्यवृत्ती मिळवणाऱ्या दलित विद्यार्थ्यांची संख्या जवळजवळ निम्म्याने कमी झाली. जी संख्या २०२३ मध्ये १.३६ लाख होती ती २०२४ मध्ये ०.६९ लाख झाली. विद्यार्थ्यांनी पुढे तक्रार केली की शिष्यवृत्तीची रक्कम अत्यंत तुटपुंजी आहे. मी बिहारमधील उदाहरणे सांगितली असली तरी हिच परिस्थिती देशभरात आहे. या अपयशांवर उपाय म्हणून सरकारने तात्काळ दोन उपाययोजना कराव्यात, असेही राहुल गांधी म्हणाले.
राहुल गांधी म्हणाले की, विद्यार्थ्यांसाठी असलेल्या प्रत्येक वसतिगृहाचे ऑडिट करा जेणेकरून चांगल्या पायाभूत सुविधा, स्वच्छता, अन्न आणि शैक्षणिक सुविधा मिळतील आणि कमतरता दूर करण्यासाठी पुरेसा निधी वाटप करा. मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती वेळेवर वितरित करा, शिष्यवृत्तीची रक्कम वाढवा आणि राज्य सरकारांशी जवळून काम करून अंमलबजावणी चांगला करा. पत्रात शेवटी मी तुमच्या सकारात्मक प्रतिसादाची वाट पाहत आहे, असेही राहुल गांधींनी आवर्जून लिहीले आहे.