पाटणा : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज पाटणा येथे व्होट अधिकार यात्रेच्या समारोप कार्यक्रमात मतचोरीच्या मुद्द्यावर मोठे विधान केले आहे. मतचोरीसंदर्भात लवकरच ‘हायड्रोजन बॉम्ब’सारखे मोठे खुलासे केले जातील, त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी देशात कोणालाही तोंड दाखवू शकणार नाहीत, असा दावा त्यांनी केला.
राहुल गांधी म्हणाले, बिहार हे एक क्रांतिकारी राज्य आहे आणि त्याने देशाला संदेश दिला आहे. आम्ही भाजपला संविधान संपवू देणार नाही, म्हणूनच ही यात्रा काढली. आम्हाला लोकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला. मोठ्या संख्येने लोक बाहेर आले आणि ‘व्होट चोर, गद्दी छोड’च्या घोषणा दिल्या.
ते पुढे म्हणाले, मी भाजपच्या लोकांना सांगू इच्छितो, तुम्ही अणुबॉम्बपेक्षा मोठी गोष्ट ऐकली आहे का? ती म्हणजे हायड्रोजन बॉम्ब. भाजपच्या लोकांनो, तयार राहा, एक हायड्रोजन बॉम्ब येत आहे. मतचोरीचे सत्य लवकरच लोकांसमोर येणार आहे. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत आणि कर्नाटकमधील बंगळूर सेंट्रल लोकसभा मतदारसंघातील महादेवपुरा विधानसभा मतदारसंघात मतांची चोरी झाल्याचे पुरावे त्यांच्या पक्षाने सादर केल्याचे राहुल गांधी यांनी सांगितले. मतचोरी म्हणजे हक्कांची, लोकशाहीची आणि रोजगाराची चोरी आहे, असा आरोपही त्यांनी केला.
राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील मतदार अधिकार यात्रा 17 ऑगस्ट रोजी सासाराम येथून सुरू झाली होती. बिहारमधील 38 जिल्ह्यांपैकी 25 जिल्ह्यांमधील 110 विधानसभा मतदारसंघांतून ही यात्रा 1,300 किलोमीटर प्रवास करत होती. पाटणामध्ये या यात्रेचा समारोप झाला यावेळी गांधींसोबत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन, आरजेडी नेते तेजस्वी यादव, विकासशील इन्सान पार्टीचे प्रमुख मुकेश सहानी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत आणि ‘इंडिया’ आघाडीचे नेते उपस्थित होते.