नवी दिल्ली : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शनिवारी पुन्हा एकदा मतचोरीचे आरोप केले. जिथे जिथे मतदार यादीचे एसआयआर Special Intensive Revision (SIR) केले जात आहे तिथे तिथे मतांची चोरी केली जात आहे, असा आरोप त्यांनी केला. गुजरातमध्ये एसआयआरच्या नावाखाली जे काही केले जात आहे ते कोणत्याही प्रकारची प्रशासकीय प्रक्रिया नाही - ती एक नियोजित, संघटित आणि धोरणात्मक मतांची चोरी आहे, असे राहुल गांधी म्हणाले. एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये त्यांनी हे आरोप केले.
सर्वात धक्कादायक आणि धोकादायक गोष्ट म्हणजे एकाच नावाखाली हजारो आक्षेप दाखल करण्यात आले. निवडकपणे, विशिष्ट समुदायांचे आणि काँग्रेस समर्थक बूथचे मत कापण्यात आले. जिथे भाजपला पराभव दिसतो तिथे मतदारांना व्यवस्थेतून काढून टाकले जाते, असा आरोप देखील गांधी यांनी केला. हाच प्रकार आळंदमध्ये दिसून आला. राजुरामध्येही असेच घडले. आणि आता गुजरात, राजस्थान आणि ज्या राज्यात एसआयआर लादण्यात आला आहे त्या प्रत्येक राज्यात तोच ब्लूप्रिंट लागू केला जात आहे, असे ते म्हणाले.
“एक व्यक्ती, एक मत” हा संवैधानिक अधिकार नष्ट करण्यासाठी एसआयआरला एक शस्त्र बनवण्यात आले आहे - जेणेकरून भाजप, सत्तेत कोण राहते हे ठरवू शकेल, असे ते म्हणाले. सर्वात गंभीर सत्य हे आहे की निवडणूक आयोग आता लोकशाहीचा रक्षक राहिलेला नाही, तर या मत चोरीच्या कटात तो एक प्रमुख सहभागी बनला आहे, असा आरोप देखील गांधी यांनी केला.