Rahul Gandhi Press Conference: काँग्रेसचे खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आज (बुधवार) दुपारी 12 वाजता नवी दिल्लीतील AICC (अखिल भारतीय काँग्रेस समिती) मुख्यालयात पत्रकार परिषद घेणार आहेत. या पत्रकार परिषदेत ते 'वोट चोरी' आणि मतदार यादीतील घोळाविषयी मोठा खुलासा करण्याची शक्यता आहे.
राहुल गांधी यांनी यापूर्वीच जाहीर केले होते की, ते लवकरच असा खुलासा करणार आहेत जो ‘हायड्रोजन बॉम्ब’ असेल. त्यांनी सांगितले होते की, महादेवनगरमध्ये त्यांनी दाखवलेला फक्त एक “अॅटम बॉम्ब” होता, खरा स्फोटक खुलासा अजून बाकी आहे.
‘वोटर अधिकार यात्रे’च्या अखेरच्या दिवशी बिहारमधील सभेत बोलताना राहुल गांधींनी भाजपवर जोरदार टीका केली. ते म्हणाले “ज्या शक्तींनी महात्मा गांधींची हत्या केली, त्या आज भारताच्या संविधानाला संपवण्याचा प्रयत्न करत आहेत. पण आम्ही त्यांना संविधान नष्ट करू देणार नाही.”
राहुल यांच्या नेतृत्वाखाली 16 दिवसांची यात्रा काढण्यात आली होती. मतदारांच्या अधिकारांबद्दल जनजागृती करण्यासाठी आणि 'वोट चोरी' तसेच मतदार याद्यांतील कथित गडबडींचा विरोध करण्यासाठी ही यात्रा काढण्यात आली होती.
राहुल गांधी म्हणाले होते की, “बिहारमधील प्रत्येक युवक आणि नागरिक आमच्या सोबत उभा आहे. महादेवनगरमध्ये आम्ही अॅटम बॉम्ब दाखवला होता, पण आता आम्ही हायड्रोजन बॉम्ब घेऊन येत आहोत. भाजप तयार रहा, त्यांची खरी बाजू देशासमोर येणार आहे.”
राहुल गांधींच्या या वक्तव्यामुळे राज्यात आणि देशभरात राजकीय वातावरण तापले आहे.
भाजपकडून या आरोपांवर अद्याप औपचारिक प्रतिक्रिया आलेली नसली तरी, पक्षाकडून या पत्रकार परिषदेनंतर तीव्र प्रत्युत्तर येण्याची शक्यता आहे. काँग्रेसच्या सूत्रांच्या मते, राहुल गांधी यांच्याकडे मतदार यादी आणि निवडणूक प्रक्रियेत झालेल्या गंभीर गैरव्यवहारांचे पुरावे आहेत, जे ते आज माध्यमांसमोर ठेवणार आहेत.