Rahul Gandhi Republic Day parade: दिल्लीच्या कर्तव्य पथावर पार पडलेल्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडवेळी लोकसभा विरोक्षीपक्षनेते राहुल गांधी आणि राज्यसभा विरोधीपक्षनेते मल्लिकार्जुन खरगे देखील उपस्थित होते. मात्र त्यांना तिसऱ्या रांगेत बसवण्यात आल्यामुळे काँग्रेसने केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. पक्षातील नेत्यांनी सरकारने प्रोटोकॉल तोडल्याचा आरोप केला आहे. यावेळी २०१४ चा एक फोटो देखील शेअर करण्या तआला आहे.
काँग्रेसचे सचिव रणदीप सिंह सुरजेवाला यांनी ट्वीट करून सरकारावर टीका केली आहे. ते आपल्या ट्विटमध्ये लिहितात की, 'देशाच्या विरोधी पक्ष नेत्यांना अशा पद्धतीची वागणूक देणं हे कोणत्या शिष्टाचारात, परंपरेत आणि प्रोटोकॉलमध्ये बसतं? यावरून सरकारची हतबलता आणि न्यूनगंडच दिसतो.'
दुसरीकडे काँग्रेस खासदार मनिकम टागोर यांनी, 'भाजपने जाणीवपूर्वक राहुल गांधी यांचा अपमान केला आहे. त्यांनी २०१४ चा फोटो देखील शेअर केला. त्यावेळी तत्कालीन विरोधीपक्षनेते एल. के. अडवणी हे पहिल्या रांगेत बसले होते. टागोर यांनी त्यावेळेचा प्रोटोकॉल आता का गुंडाळून ठेवला जात आहे. याद्वारे मोदी आणि शहा यांना खरगेजी आणि राहुलजी यांचा अपमान करायचा आहे का?' असे ट्विट केले.
दरम्यान, राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांना तिसऱ्या रांगेत का बसवण्यात आलं याबाबत केंद्र सरकारनं अद्याप खुलासा केलेला नाही. दरम्यान, प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाला कोणी कुठं बसायचं याचा प्रोटोकॉल हा राष्ट्रपती सचिवालय जाहीर करत असतात.
विरोधी पक्ष नेत्यांची प्रेसिडेन्समधील रँक ही सातव्या स्थानावर आहे. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल, माजी राष्ट्रपती, उप पंतप्रधान, सर्वोच्च न्यायालयाचे चीफ जस्टीस, लोकसभाचे सभापती, विरोधीपक्ष नेते, कॅबिनेट मंत्री, मुख्यमंत्री आणि माजी पंतप्रधान अशी प्रेसिडेन्स रँक असते.
दरम्यान भाजपने काँग्रेस याचे राजकारण करत आहे असा आरोप केला. भाजप प्रवक्ते प्रदीप भंडारी यांनी ट्विट केलं की, 'राहुल गांधी यांना तिसऱ्या रांगेत बसण्यास काही हरकत नव्हती. उलट ते ज्यावेळी देश कर्तव्य पथावर ब्रम्होस मिसाईलचा आनंद घेत होता त्यावेळी ते फोनवर बोलताना सापडून नयेत म्हणून लपले होते.'