अमेरिकेतील टेक्सास विद्यापीठातील विद्यार्थ्यांशी संवाद साधताना राहुल गांधी. (Image source- X)
राष्ट्रीय

"भारत जोडो यात्रा मी माझ्‍याविरोधात..." : अमेरिकेत राहुल गांधी असं का म्‍हणाले?

पुढारी वृत्तसेवा

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : "आमच्‍यासाठी भारतातील सर्व संपर्क वाहिन्‍याच बंद होत्‍या. आम्‍ही संसदेत दिलेली भाषणे टीव्‍हीवर दाखवली जात नव्‍हती. माध्‍यमांचे आमच्‍याकडे दुर्लक्ष होत होते. आम्‍हाला कायदेशीर मदतही मिळत नव्‍हती. अशावेळी आम्‍ही थेट जनतेशी संवाद साधण्‍याचा निर्णय घेतला. भारत जोडो यात्रा अभियान सुरु झालं. ही यात्रा कोणाचाही विरोधात नव्‍हती तर मी माझ्‍याविरोधात सुरु केली होती. भारत जोडो यात्रेनिमित्त झालेल्‍या प्रवासाने माझ्‍यात अनेक बदल घडवून आणले. हा प्रवास केवळ भौतिक प्रवास नव्हता, तर हा एक आध्यात्मिक आणि राजकीय प्रवास होता," अशा शब्‍दांमध्‍ये काँग्रेस नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी अमेरिकेत भारत जोडो यात्रेच्‍या प्रवास कथन केला.

अमेरिकेतील टेक्सास विद्यापीठातील विद्यार्थ्यांशी संवाद साधताना राहुल गांधी यांनी आपला अध्यात्म आणि राजकारण प्रवासच शब्‍दबद्‍ध केला. भारत जोडो यात्रेपासून ते भाजप या सर्व गोष्टींबद्दल त्‍यांनी मनमोकळा संवादही साधला

... म्‍हणून भारत जोडो यात्रेचे आयाेजन

यावेळी राहुल गांधी यांनी भारत जोडा यात्रा सुरु करण्‍यामागील कारण सांगितले. ते म्‍हणाले, " भारतातील सर्व संपर्क वाहिन्या आमच्यासाठी बंद होत्या. संसदेत दिलेली भाषणे टीव्हीवर दाखवली जात नव्‍हती. माध्‍यम आमच्याकडे दुर्लक्ष करत होता. अशातच आम्हाला कायदेशीर मदतही मिळत नव्हती. अशा परिस्थितीत आम्ही थेट लोकांपर्यंत जाण्याचा मार्ग निवडला आणि देशभरात 4 हजार किलोमीटरचा प्रवास करण्याचा निर्णय घेतला. या प्रवासाच्या सुरुवातीला अडचणी आल्या. मला गुडघ्याचा त्रास होता, रोज सकाळी उठून 10 किलोमीटर चालल्यामुळे पहिले 3-4 दिवस मी विचार केला की मी काय केले? कालांतराने प्रवासामुळे माझ्यात बरेच बदल झाले. "

भारत जोडो यात्रा कोणाचा विरोधात नव्‍हती

भारत जोडो यात्रा हा प्रवास इतर कोणाचाही विरोधात नव्‍हता तर हा प्रवास माझ्या विरोधात होता. या प्रवासाने माझ्यात अनेक बदल घडवून आणले आणि माझा राजकीय दृष्टिकोन पूर्णपणे बदलला. यातून मला आणि माझ्या टीमला अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या.

हा एक आध्‍यात्‍मिक आणि राजकीय प्रवास होता

राहुल गांधी म्हणाले, "भारतीय राजकारणात सामान्यतः प्रेमाला स्थान नाही. इथे फक्त द्वेष, राग, अन्याय, भ्रष्टाचार या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. भारत जोडो यात्रेनिमित्त भारतीय राजकारणात प्रेमाची संकल्पना समोर आली. माझ्यासाठी हा सर्वात महत्त्वाचा धडा होता की राजकारणात प्रेम महत्त्‍वपूर्ण भूमिका बजावू शकते. हा प्रवास केवळ भौतिक प्रवास नव्हता, तर हा एक आध्यात्मिक आणि राजकीय प्रवास होता."

'लोकसभा निवडणुकीने भाजपची भीती संपवली'

या वर्षी भारतातील लोकसभा निवडणुकीचा निकाल हा माझा किंवा काँग्रेस पक्षाचा विजय नसून भारतीय जनतेच्या इच्छेचे प्रतिबिंब आहे. संविधान आणि लोकशाही मूल्ये कमकुवत करण्याच्या सरकारच्या कथित प्रयत्नांच्या विरोधात भारतातील लोक उभे राहिले. आपल्या धर्मावर, देशावर होणारे हल्ले आपल्याला मान्य नाहीत, हे त्यांनी सिद्ध केले.२०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या निकालांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपबद्दलची भीती लोकांच्या मनातून काढून टाकली आहे. भाजपला स्वबळावर बहुमत मिळवता न आल्याने काही मिनिटांतच भारतात पंतप्रधान किंवा भाजपला कोणीही घाबरत नाही हे आपण पाहिले, अशा शब्‍दांमध्‍ये त्‍यांनी भाजपवरही निशाणा साधला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT