पुढारी ऑनलाईन डेस्क : Parliament Winter Session | देशातील राजकीय, सामाजिक, आर्थिक समानता संपुष्टात आणली जात आहे. सरकारकडून इमानदारीने काम करणाऱ्या सर्वांचे अंगठे कापले जात आहेत, अशी टीका लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी भाजपवर केली. शनिवारी लोकसभेत भारतीय राज्यघटनेच्या ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त झालेल्या चर्चेदरम्यान राहुल गांधींनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.
राज्यघटनेतून डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी आणि पंडीत नेहरूंचे विचार ध्वनीत होतात. हे विचार भारताच्या समृद्ध संस्कृतीचे प्रतिक आहेत. मात्र भाजपवाले चोवीस तास संविधानावर हल्ला करतात, असे राहुल गांधी म्हणाले. दौणाचार्यांनी एकलव्याचा अंगठा कापला होता, तसाच देशाचा अंगठा कापला जात आहे. देशातील तरूण, मागसवर्गींयांचे, मजूरांचे अंगठे कापले जात आहेत. देशातील सर्व क्षेत्र अदानींच्या घशात घातले जात आहेत. अग्निवीर योजनेमुळे सैन्यभरतीसाठी तयारी करणाऱ्यांचे अंगठे कापले. अदानी, अंबानी यांना मदत करून शेतकऱ्यांचे अंगठे कापले जात आहेत, अशी जोरदार टीका त्यांनी सरकारवर केली. त्यामुळे आमचं पुढचं पाऊलं जातनिहाय जनगणना असेल. तसेच ५० टक्के आरक्षणाची भिंत आम्ही पाडणार आहे, असेही राहुल गांधी म्हणाले.