नवी दिल्ली : तुमचे रक्त फक्त कॅमेऱ्यासमोरच उकळते का? असा प्रश्न विचारत लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर थेट हल्ला चढवला. तसेच पंतप्रधानांनी भारताच्या सन्मानाशी तडजोड केली आहे, त्यांनी पोकळ भाषणे देणे बंद करावे, असेही राहुल गांधी म्हणाले.
'भारताने पाकिस्तानवर कारवाई केल्यानंतर पाकिस्तानने आम्ही यापुढे कारवाई करणार नाही, असे म्हटले होते. त्यावर भारताने विचार केला,' अशा आशयाचा पंतप्रधान मोदींचा एक व्हिडिओ राहुल गांधींनी समाज माध्यमांवर शेअर केला आणि पंतप्रधानांना प्रश्न विचारले. सोबतच अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या शस्त्रसंधीच्या मध्यस्थीवरूनही राहुल गांधींनी सातत्याने प्रश्न विचारले आहेत. त्यानंतर गुरूवारी पंतप्रधानांनी राजस्थानच्या बिकानेर मध्ये केलेल्या भाषणावरूनही राहुल गांधींनी टीका केली आणि पंतप्रधानांना ३ खोचक प्रश्न विचारले.
राहुल गांधींचे प्रश्न
1. आतंकवादाच्या बाबतीत पाकिस्तानच्या शब्दांवर विश्वास का ठेवला?
2. तुम्ही ट्रंपसमोर झुकून भारताच्या हिताचा बळी का दिला?
3. तुमचे रक्त फक्त कॅमेऱ्यासमोरच का उकळते?"
पंतप्रधान नरेंद्र मोदी राजस्थान दौऱ्यावर असताना त्यांनी आक्रमक भाषण केले आणि पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर केलेल्या कारवाईवर भाष्य केले. यामध्ये त्यांनी ऑपरेशन सिंदूर कसे य़शस्वीपणे राबवले, हेही सांगितले. मात्र पंतप्रधान म्हणून त्यांनी वेळोवेळी घेतलेल्या भुमिकेवर राहुल गांधींनी सातत्याने प्रश्न उपस्थित केले आहेत.