राष्ट्रीय

Rahul Gandhi vs Mamata Banerjee : राहुल गांधी ममता बॅनर्जींवर भडकले, म्हणाले; ‘बंगालमध्ये तृणमूलचे गुंडाराज!’

काँग्रेस कार्यकर्त्याच्या हत्येवरून तीव्र संताप व्यक्त

पुढारी वृत्तसेवा

कोलकाता : पश्चिम बंगालमधील आसनसोल येथे काँग्रेस कार्यकर्त्याची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेचे पडसाद आता राष्ट्रीय राजकारणात उमटू लागले असून, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सत्ताधारी तृणमूल काँग्रेसवर (TMC) कडक शब्दांत ताशेरे ओढले आहेत. ‘पश्चिम बंगालमध्ये आज लोकशाही उरलेली नसून तृणमूलचे 'गुंडाराज' सुरू आहे,’ अशा शब्दांत राहुल गांधींनी संताप व्यक्त केला आहे.

राहुल गांधींचा घणाघात

काँग्रेस कार्यकर्ते देबदीप चटर्जी यांची निवडणुकीनंतर तृणमूल काँग्रेसशी संबंधित गुंडांनी हत्या केल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. या घटनेचा निषेध करताना राहुल गांधी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, "निवडणुकीनंतर विरोधी आवाज दाबणे, धमकावणे आणि त्यांची हत्या करणे हेच आता तृणमूल काँग्रेसचे चारित्र्य बनले आहे. काँग्रेसचे राजकारण कधीही हिंसेवर आधारित नव्हते आणि नसेलही. आम्ही आमचे कार्यकर्ते गमावले आहेत, तरीही आम्ही नेहमीच अहिंसा आणि संविधानाचा मार्ग निवडला आहे. हीच आमची परंपरा आणि संकल्प आहे."

राहुल गांधी यांनी पीडित कुटुंबाप्रती संवेदना व्यक्त करतानाच, गुन्हेगारांना तातडीने अटक करून कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे. तसेच देबदीप यांच्या कुटुंबाला पूर्ण सुरक्षा आणि नुकसान भरपाई देण्यात यावी, असेही त्यांनी ठामपणे नमूद केले. "भारताच्या अहिंसक परंपरेला कलंकित करणाऱ्या अशा राजकारणासमोर आम्ही झुकणार नाही, न्याय मिळवूनच राहू," असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.

प्रशासकीय निष्काळजीपणावर बंगाल काँग्रेसचा निशाणा

पश्चिम बंगाल प्रदेश काँग्रेस कमिटीने या घटनेचा तीव्र निषेध नोंदवला असून राज्यातील बिघडलेल्या कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. देबदीप चटर्जी हे आसनसोल उत्तरमधील काँग्रेस उमेदवार प्रसेनजीत पुइतांडी यांचे निकटवर्तीय म्हणून कार्यरत होते. सत्ताधारी पक्षाशी संबंधित गुंडांनी त्यांना बेदम मारहाण केली, ज्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला.

काँग्रेसने आरोप केला आहे की, इतकी गंभीर घटना घडूनही प्राथमिक माहिती अहवाल (FIR) नोंदवण्यास टाळाटाळ करण्यात आली, जे प्रशासकीय निष्काळजीपणाचे जिवंत उदाहरण आहे. निवडणुकीनंतर झालेली ही हिंसा राजकीय सूडबुद्धीचे लक्षण असून विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला असल्याचे पक्षाने म्हटले आहे. "भीती आणि हिंसेच्या वातावरणात लोकशाही जिवंत राहू शकत नाही. आम्ही या अत्याचाराविरोधात आवाज उठवत राहू आणि पीडितांना न्याय मिळेपर्यंत लढा देऊ," अशी भूमिका बंगाल काँग्रेसने मांडली आहे.

या हत्येमुळे पश्चिम बंगालमधील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले असून, आगामी काळात तृणमूल आणि काँग्रेसमधील संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT