Rahul Gandhi on Delimitation Bill : "'मतदारसंघ पुनर्रचना' विधेयकाला आम्ही का विरोध करत आहोत हे आमच्या विचारांशी सहमत नाहीत त्यांनी हे समजून घेणे आवश्यक आहे. हा मुद्दा ८५० संख्येचा आहे. भारतीय लोकशाहीवर विश्वास ठेवणाऱ्यांनी ते आमच्या बाजूचे असोत किंवा इतर कोणाच्याही बाजूचे अगदी एनडीए (NDA) मधील घटक पक्ष असोत, माझा संदेश हा आहे की, येथे जे काही घडत आहे, तो भारतीय लोकशाहीचा मृत्यू आहे. मी जगन यांना सांगत आहे, मी चंद्राबाबू नायडूजींना सांगत आहे. त्यांच्या इतर सर्व सहकाऱ्यांनाही सांगत आहे. भारतीय लोकशाहीची हत्या केली जात आहे; कृपया जागे व्हा," असे आवाहन लोकसभा विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी आज (दि. २८) केले. नवी दिल्ली येथील एआयसीसी (AICC) मुख्यालयात काँग्रेस पक्षाच्या वतीने आयोजित पत्रकार परिषद ते बोलत होते.
यावेळी राहुल गांधी म्हणाले की, केंद्र सरकारला असे वाटते की, लोकसभेत ५४३ ऐवजी ८५० सदस्य असावेत. यासाठी आता सरकार महिला आरक्षणाचा आधार घेत आहे. महिला आरक्षण विधेयक आधीच मंजूर झाले आहे; त्याची अंमलबजावणी उद्यापासूनही होऊ शकते. मग प्रश्न असा पडतो की, ८५० चा आकडाच का? याचे उत्तर आसाम आणि जम्मू-काश्मीरमध्ये दडलेले आहे; कारण ८५० जागांच्या माध्यमातून भारतातील निवडणुकीत मोठे बदल घडवून आणले जाऊ शकतात आणि मतदारसंघाचा नकाशा पूर्णपणे नव्याने आखला जाऊ शकतो.
"हवे तिथे निवडणुकांमध्ये फेरफार करता येतात, ही कल्पना आता जुनी झाली आहे. कदाचित ते अजूनही फेरफार करू शकत असतील, पण आता देशाला हे ठाऊक आहे की ते असे करत आहेत. आमच्याकडील आकडेवारीनुसार, भारतातील ८०% जनता आणि 'जनरेशन झी' (Gen Z) मधील जवळपास १००% तरुण असा विश्वास ठेवतात की नरेंद्र मोदी, अमित शहा आणि ज्ञानेश कुमार निवडणुकांमध्ये फेरफार (मते चोरणे) करतात. आता त्यांनी एक नवीन योजना आखली आहे."
"निवडणूक आयोगाच्या स्वतःच्या माहितीनुसार, २०२४ ची निवडणूक बेकायदेशीर होती. जम्मू-काश्मीरमध्ये निवडणूक मतदारसंघांची पुनर्रचना करण्यात आली. बिहारमध्ये आम्ही दाखवून दिले की, मतदारांची नावे कशी वगळण्यात आली. आसाममध्ये भाजपला फायदा व्हावा म्हणून राज्याची संपूर्ण रचनाच बदलण्यात आली. पश्चिम बंगालमध्ये १०० हून अधिक जागा जणू चोरल्याच गेल्या," असा आरोपही त्यांनी केला.
"आम्ही मोदी, शहा आणि ज्ञानेश यांना कोंडीत पकडले आहे. त्यांनाही हे ठाऊक आहे आणि आम्हालाही. मी सांगितल्याप्रमाणे, आमच्याकडे ज्ञानेश कुमार यांच्याबद्दल महत्त्वाची माहिती आहे आणि ते यातून सुटू शकणार नाहीत. आम्ही लवकरच ही माहिती सर्वांसमोर आणू," असा दावाही राहुल गांधी यांनी यावेळी केला.