नवी दिल्ली : वृत्तसंस्था
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी कॉक्रोच जनता पार्टीच्या (सीजेपी) आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला आहे. शांततापूर्ण मार्गाने तिरंगा फडकावणाऱ्या तरुणांना तुरुंगात टाकणे हे भ्याडपणाचे कृत्य असल्याचे सांगत त्यांनी सरकारवर निशाणा साधला.
राहुल गांधी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर भूमिका स्पष्ट करताना म्हटले, 'जंतर मंतरवर शांततेत तिरंगा फडकावणे हा गुन्हा नाही. यासाठी तरुणांना तुरुंगात पाठवणे हा भ्याडपणा आहे. विद्यार्थी, तरुण, पत्रकार आणि 'इंडिया' आघाडी... झेंडे वेगळे असले तरी उद्देश एकच आहे.
संविधानाने दिलेले अधिकार मागणाऱ्या नागरिकांचे हे एकच आंदोलन आहे. जंतर मंतर भारताच्या जनतेचे आहे आणि आम्ही त्यावर पुन्हा हक्क मिळवू.' काँग्रेसने आतापर्यंत 'सीजेपी' पासून सुरक्षित अंतर राखले होते; मात्र राहुल यांच्या या भूमिकेने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे.
दिल्ली पोलिसांच्या माहितीनुसार, सौरव दास, आशुतोष रांका आणि अजिंक्य शिंदे यांनी आंदोलन स्थळ म्हणून रद्द केलेल्या जंतर मंतर परिसरात परवानगीशिवाय प्रवेश केला. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत घोषणाबाजी केल्याने ही कारवाई करण्यात आली. दास आणि रांका यांना तिहार तुरुंगात पाठवण्यात आले, तर शिंदे यांची जामिनावर सुटका झाली.