नवी दिल्ली : मतदार यादीचे विशेष सघन पुनरीक्षण (एसआयआर) हे मतचोरीवर पांघरूण घालण्याचा आणि त्याला संस्थात्मक स्वरूप देण्याचा एक प्रयत्न आहे, असा गंभीर आरोप लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी रविवारी केला.
मध्य प्रदेश दौऱ्यावेळी पत्रकारांशी बोलताना गांधी म्हणाले की, हरियाणाप्रमाणेच मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि छत्तीसगडमध्येही मतचोरी झाली आहे, असा त्यांचा विश्वास आहे. ‘मतचोरी हा एक मोठा मुद्दा आहे आणि आता हे विशेष सघन पुनरीक्षण म्हणजे त्यावर पांघरूण घालून या संपूर्ण प्रणालीला संस्थात्मक स्वरूप देण्याचा प्रयत्न आहे,’ असा दावा काँग्रेस खासदाराने केला. ‘काही दिवसांपूर्वी मी हरियाणाबद्दल एक सादरीकरण दिले आणि मला स्पष्टपणे दिसले की, तिथे मतचोरी झाली. 25 लाख मते चोरली गेली. प्रत्येक 8 मतांमागे 1 मत चोरले गेले,’ असा आरोप गांधी यांनी केला. ‘ती आकडेवारी पाहिल्यानंतर मला विश्वास आहे की, मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि छत्तीसगडमध्येही असेच घडले आहे. आणि ही भाजप आणि निवडणूक आयोगाची एक प्रणाली आहे,’ असा थेट आरोप त्यांनी केला. भविष्यात आणखी तपशील उघड करणार का, असे विचारले असता गांधी म्हणाले की, त्यांच्याकडे खूप वेगळी आणि तपशीलवार माहिती आहे आणि ते ती हळूहळू जाहीर करतील. आत्ता फक्त थोडेच दाखवले आहेे.